नाद करायचा नाय… मॅच अमेरिकेत, पण जल्लोष आपल्या कोल्हापूरात

नाद करायचा नाय… मॅच अमेरिकेत, पण जल्लोष आपल्या कोल्हापूरात
- Advertisement -

कोल्हापूर : कोपा अमेरिकन फुटबॉल कप स्पर्धेत लिओनेल मेस्सीच्या अर्जेटिनाने नेमारच्या ब्राझिलचा पराभव केल्यानंतर कोल्हापूरात सकाळप्रहरी अर्जेटिनाच्या समर्थकांनी हलगी ताशाच्या तालावर नृत्य करत, फटाके फोडून जल्लोष साजरा केला. तर ब्राझिलचे समर्थक निराश झाले होते. अर्जेटिनाच्या विजयाला कोल्हापूरातील स्थानिक फुटबॉल संघातील इर्षेची किनारही पहायला मिळाली.

गेले महिनाभर निम्म्याहून अधिक कोल्हापूर रात्री उशिरापर्यंत जागून युरो कप तर पहाटे लवकर उठून कोपा अमेरिकेचे सामने पहात आहेत. रविवारी सकाळी कोपा कपची तर मध्यरात्री युरो कपचा अंतिम सामन्यासाठी समर्थकांनी जय्यत तयारी केली होती. ब्राझिल आणि अर्जेटिना या बलाढ्य संघातील सामना असल्याने कोल्हापूरातील फुटबॉल शौकिनांच्यात पैजाही लागल्या होत्या. जरी सामने ब्राझिलमध्ये असले तरी स्थानिक संघातील ईष्याही पहायला मिळाली. कोल्हापूरातील बलाढ्य संघ पाटाकडीलचे बहुतांशी समर्थक ब्राझिलचे तर खंडोबा, दिलबहार आणि जुना बुधवार तालमीचे समर्थक अर्जेटिना संघाकडून होते. पाटाकडीलची जर्शी पिवळ्या निळ्या रंगाची तर खंडोबा, दिलबहार, जुना बुधवार संघाची जर्शी निळ्या पांढऱ्या रंगाची आहे. त्यामुळे ब्राझिल आणि अर्जेटिना या संघात कोल्हापूरातील समर्थक विभागले होते.

अंतिम सामना टीव्हीवर एकत्रित पाहण्यासाठी तालीम, मंडळांमध्ये अंथरुण पांघरुन घेऊन समर्थक आले होते. गेले दोन दिवश सोशल मिडियावर अर्जटिना जिंकणार की ब्राझिल जिंकणार यावर वॉर सुरू होते. अंतिम सामन्यात अर्जेटिनाच्या डी मारियोने गोल करताच अर्जेटिनाच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. सामना बरोबरीत आणण्यासाठी ब्राझिलचे खेळाडू इर्षेने खेळत होते. मेस्सी आणि नेमारची जुगलबंदीही पहायला मिळाली. अखेर एक गोलचे अधिक्य कायम ठेवत अर्जेटिनाने सामना जिंकल्यावर अर्जेटिनाच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. अनेकांनी फटाक्याची आतषबाजी केली. खंडोबा तालमीच्या अर्जेटिनाच्या समर्थकांनी संघाने हलगी ताशाच्या वादकांना पाचारण केले. संघाने यापूर्वी स्थानिक सामन्यात जिंकलेला मोठा उंचीचा चषक डोक्यावर घेऊन हलगी तालाच्या तालावर समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. ‘नाद खुळा, पांढरा निळा’ अशा घोषणा देत लहान मुलांसह तरुणाई बेधुंद नाचत होती. हीच स्थिती जुना बुधवार, दिलबहार तालीम परिसरातही पहायला मिळाली.

कोल्हापूर शहरात १६ वरिष्ठ संघांसह १२५ फुटबॉल संघ आहेत. दोन ते अडीच हजार फुटबॉल खेळाडू आहेत. वरिष्ठ संघातील समर्थकामध्ये मोठी ईष्या असते. त्यामुळे मैदानावर अनेकवेळा दंगलीचे पडसादही पहायला मिळतात. संघाची ईर्ष्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीत पहायला मिळते. संघ ब्राझिलचा अथवा अर्जेटिनाचा असला तरी स्थानिक संघाची नाळ या दोन संघाबरोबर जुळली असल्याने विश्वचषक, युरो आणि कोपा अमेरिकन स्पर्धेत संघांचे समर्थक विभागले आहेत.

Source link

- Advertisement -