पुणे : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे जगभरात चाहते आहेत. नुकतेच त्याच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने कोपा अमेरिका 2021च्या अंतिम सामन्यात ब्राझीलला हरवत जेतेपद पटकावले. अर्जेंटिनासाठी पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकल्यानंतर मेस्सीचे चाहते उत्सव साजरा करत आहेत. मेस्सीवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे मेस्सी बीडीच्या फोटोने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. काही वेळातच मेस्सी बीडीचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. भारतामधील एका बीडीच्या आवरणावर मेस्सीचा फोटो झळकल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. भारतातील मेस्सीची पहिली जाहिरात असे म्हणत नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून मेस्सी बीडीचा फोटो शेअर केला आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील धुलियाम येथे या बीडीचा कारखाना आहे. या कारखान्यात बीडीचे मोठे उत्पादन घेतले जाते. या बीडी उत्पादक कंपनीने मेस्सीच्या नावावर आपल्या बीडीचे नाव मेस्सी बीडी असे ठेवले. ही बीडी नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहे.
मेस्सीने कोपा अमेरिका जिंकल्याने त्याला भारतात लगेच जाहिरात मिळण्यास सुरवात झाली आहे, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. कोपा जिंकल्यानंतर मेस्सीची लाईफ बनली. मेस्सी बीडीच्या अगोदर 2016 पासून आमच्याकडे सीआर7 म्हणजे रोनाल्डो बीडीही उपलब्ध आहे.
दरम्यान, 1993मध्ये अर्जेंटिनाने कोपाचे जेतेपद जिंकले होते. त्यानंतर अर्जेंटिनाने 2014च्या वर्ल्डकप फायनल, 2015 आणि 2016 च्या कोपाच्या फायनलमध्ये धडक मारली होती, पण विजय मिळवता आला नव्हता. निराश झालेल्या मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण राष्ट्रपतींच्या आवाहनानंतर त्याने पुन्हा पुनरागमन केले. त्यानंतर आता अर्जेंटिनाला जेतेपद मिळवून देण्याचे मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले. पण आता मेस्सी आपल्या देशाला आगामी विश्वचषक जिंकवून देणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच लागली असेल. मेस्सीने जर आगामी विश्वचषक देशाला जिंकवून दिला तर त्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाईल.
Source link