Home ताज्या बातम्या रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३ – मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

चांदीवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसनासाठी दिलेल्या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार दिलीप मामा लांडे,अशोक माटेकर, किरण लांडे, शैलेश निंबाळकर, बाबू पुराणिक आदी    उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांच्या चाव्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला भगिनींनी मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार केला.

श्री शिंदे म्हणाले की, मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, महापालिका यांना दिले आहेत. पहिल्या टप्प्यात 2 लाख घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही घरे दर्जेदार व्हावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

श्री शिंदे म्हणाले की, चांदीवलीतील प्रकल्प बाधित झोपडपट्टी धारकांना आज 400 घरांच्या चाव्या देण्यात येत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे हे सरकार आहे. त्यामुळे विकास कामाबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या शासनाने गेल्या दोन वर्षात विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचे काम केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत  वाढवली आहे. पुढील काळात १५०० रुपयाची रक्कम वाढविण्यात येईल. या बरोबरच महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तरुणांसाठी युवा कौशल्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना सुरू केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळावी म्हणून मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत पाच लाखापर्यंत चे मोफत उपचार देण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे आयुष्यात चांगले दिवस यावेत म्हणून या कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मिठी नदीच्या किनाऱ्यावरील झोपडपट्टी धारकांना चांगले घर मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 85 कोटी देऊन आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकारातून क्रांती नगर व संदेश नगर येथील प्रकल्पग्रस्तांच्या सदनिका दुरुस्ती करून दिल्या आहेत. आपल्या तरुणांसाठी राज्य शासनाने जर्मनी बरोबर करार केले आहे. त्यानुसार वर्षभरात सुमारे 30 लाख युवकांना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी नाव नोंदणी करावे.

आमदार श्री. लांडे यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्प बधितांच्या सदनिका साठी 85 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. लांडे यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले.

0000