सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : कणखर व बुध्दीमान युवा बनविण्याच्या कार्याचा पाया अंकुर बाल शिक्षण उपक्रमाने सुरू केल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे आज अंकुर बाल शिक्षण उपक्रम पुस्तक प्रकाशन व बाल संसाधन आणि विकास केंद्र शुभारंभाचा सोहळा संपन्न झाला. त्यावेळी डॉ. खाडे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार सर्वश्री मोहनराव कदम, गोपीचंद पडळकर, अनिल बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भारती बिराजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष प्राजक्ता कोरे, समाज कल्याण माजी सभापती प्रमोद शेंडगे आदि उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डुडी यांनी प्रास्ताविकामध्ये एकात्मिक बाल विकास योजना, अंकुर बाल शिक्षण उपक्रम, बाल संसाधन व विकास केंद्र तसेच जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी बोलताना कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्यात कुपोषण नाही ही अभिमानाची गोष्ट आहे. याचे सर्व श्रेय अंगणवाडी ताईंना जाते. एक मोठा उपक्रम जिल्ह्यात सुरू होत आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने मी जिल्हा परिषदेची यंत्रणा, अधिकारी व सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना शुभेच्छा देतो व त्यांचे अभिनंदन करतो. अशा उपक्रमांमधूनच जिल्ह्याचा विकास होतो व आपला जिल्हा नेहमीच राज्य शासनासाठी मार्गदर्शक ठरला आहे. देशासाठी मार्गदर्शक ठरेल असे काम या उपक्रमाच्या माध्यमातून घडावे, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार श्री. पडळकर म्हणाले, शासन व प्रशासन यांनी एकत्र काम केल्यास योजना तळागाळापर्यंत पोहचतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वाढती पटसंख्या हे जिल्हा परिषद प्रशासनाचे यश आहे. नविन पिढीला आकार देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात. राष्ट्राच्या उभारणीत त्यांची महत्वाची भूमिका आहे. राष्ट्राचा पाया मजबूत करण्याचे काम अंगणवाडी सेविका करीत असल्याचेही ते म्हणाले.
सुरवातीस कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी महिला व बाल विकास विभागातर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉल्सची पाहणी केली. त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 13 अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना आदर्श पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच शिराळा, पलूस, कवठेमहांकाळ, आटपाडी येथील उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षकांनाही आदर्श पुरस्कार देण्यात आला. तर बाल विकास अधिकारी मनिषा साळुंखे व राहूल बिरनाळे तसेच सहाय्यक बाल विकास अधिकारी दीपलक्ष्मी परनाकर व परवीन पटेल यानांही पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच अंकुर बाल शिक्षण उपक्रम पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.