Home अश्रेणीबद्ध अंगावर गाडी घालून भाजपच्या नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

अंगावर गाडी घालून भाजपच्या नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी :आपल्या पतीसह मुलीला भेटण्यासाठी जात असलेल्या भाजप नगरसेविकेच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच चापट मारुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार (दि. 12) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निगडी येथील भक्‍ती-शक्‍ती चौकात घडली.

याप्रकरणी नगरसेविकेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन फॉर्च्युनर गाडी (एमएच-14/जीएस/909)चा चालक आणि अशोक काळे (वय 57, रा. ऐश्वर्या बंगला, कृष्णानगर, चिंचवड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अद्याप अटक केलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेविका आणि त्यांचे पती आपल्या मुलीला भेटण्यासाठी निगडी येथे गेले होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते भक्‍तीशक्‍ती चौक येथून जात असताना आरोपींनी फॉर्च्युनर गाडी (एमएच 14/जीएस/909) नगरसेविकेच्या मोटारीला आडवी लावली. त्यानंतर आरोपी मोटारचालक याने नगरसेविकेला गाडीतून उतरायला लावले व महिला नगरसेविकेशी अश्‍लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला.

तसेच ‘ऐ तूने मेरे मालिक के खिलाफ पोलीसमें क्‍यों तक्रार किया’ असे म्हणून नगरसेविकेला चापट मारली. मोटारीत बसलेल्या आरोपी काळे याने ‘गाडी डाल उसके ऊपर’ असे म्हणत अश्‍लील हातवारे करीत विनयभंग केला. त्यानंतर आरोपी चालकाने आपल्या ताब्यातील गाडी नगरसेविकेच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत नगरसेविकेने फिर्याद दिल्यानंतर निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. घाडगे याबाबत अधिक तपास करीत आहेत.