इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाला चौथ्या स्थानाची चिंता होती. ही जबाबदारी अंबाती रायुडू हा उत्तमपद्धतीने हाताळत होता. पण तरीही रायुडू विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. याबाबत आता निवड समिती अध्यक्षांनी खंत व्यक्त केली आहे.
भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी यावेळी धोनीच्या निवृत्तीबाबतही आपले मत व्यक्त केले. प्रसाद म्हणाले की, ” निवड समिती नेहमीच युवा खेळाडूंना संधी देत असते. युवा खेळाडूंना पुरेशी संधी देऊन त्यांना संघातील स्थान कसे निर्माण करता येईल आणि संघाला त्यांच्या कामगिरीचा कसा फायदा होईल, हे आम्ही पाहत असतो. त्यामुळे आगामी स्पर्धा पाहिल्या तर युवा खेळाडूंना जास्त संधी द्यायला हव्यात, असे माझे वैयक्तिक मत आहे.”
ते पुढे म्हणाले की, ” एक खेळाडू म्हणून मला विचाराल तर मी धोनीचा फार मोठा चाहता आहे. धोनी एक कर्णधार म्हणून महान होता आणि एक खेळाडू म्हणूनही उत्तम आहे. पण आता धोनीला कधी खेळायचे आहे किंवा निवृत्ती घ्यायची आहे, हा निर्णय त्यालाच घ्यावा लागेल. कारण धोनीसारख्या महान खेळाडूंना आपण कधी निवृत्ती घ्यावी, हे चांगलेच माहिती असते.”
रायुडूबाबत प्रसाद म्हणाले की, ” रायुडूवर आम्ही २०१६ सालापासून लक्ष ठेवून होतो. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे रायुडूला भारताच्या संघात स्थान दिले, असे म्हटले जायचे. पण विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वी आम्ही रायुडूला फिटनेसवर लक्ष द्यायला सांगितले होते. त्यासाठी राष्ट्रीय अकादमीमध्ये आम्ही त्याची काही चाचणीही घेतली होती. पण रायुडूला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले नाही, माझ्यासाठी ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट होती.”