अकरावीला निम्म्या विद्यार्थ्यांचे प्रवेश

- Advertisement -

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अर्ज केलेल्या एकुण ६३ हजार ५६६ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीअखेर प्रवेश निश्चित केले आहेत. दरम्यान, आज (दि. २७) पासून तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर दि.१ ऑगस्ट रोजी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दोन नियमित फेऱ्या पुर्ण झाल्या आहेत. या प्रक्रियेत पहिल्या फेरीत २६ हजार ५२० तर दुसऱ्या फेरीत ९ हजार १३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यानंतर आता केवळ एकच नियमित फेरी होणार असून त्यानंतर प्रथम प्राधान्याने येणाऱ्या या फेऱ्या सुरू होणार आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये एकुण ३२ हजार ९७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २० हजार ६०१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. तर त्यापैकी ११ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. एकुण ३६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला असून २९ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. 
दुसऱ्या फेरीची प्रक्रिया पुर्ण झाल्याने आता तिसरी नियमित फेरी दि. २७ जुलैपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ व २ भरण्यासाठी दि. २९ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये पहिला पसंती क्रम मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होता येणार नाही. तसेच पसंतीक्रम २ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्यास किंवा रद्द केला असल्यास त्यांनाही तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव प्रविण आहिरे यांनी दिली.
———
तिसऱ्या फेरीचे प्रवेश
– दि. २७ ते २९ जुलै – भाग १ व भाग २ भरणे
– दि. १ ऑगस्ट (सायं. ६) – तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे
——- 
दुसऱ्या फेरीअखेर प्रवेश
प्रवेश क्षमता – १,०४०००
एकुण अर्ज – ६३,५६६
प्रवेश निश्चित – ३५,६५६

- Advertisement -