हायलाइट्स:
- अभिनेता अक्षय कुमारने घेतली बीएसएफ, भारतीय जवानांची भेट
- जवानांसोबत अक्षयने केला भांगडा
- काश्मीर खो-यातील नीरू गावातील शाळेसाठी केली आर्थिक मदत
अक्षय कुमारने गुरुवारी दुपारी काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यातील गुरेज खो-यातील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या नीरू गावात गेला. तिथे त्याने बीएसएफ आणि भारतीय सैन्यातील जवानांशी संवाद साधला. यावेळी संपूर्ण देश त्यांच्यासोबत असल्याचे सांगत जवानांचा उत्साह वाढवला. इतकेच नाही तर अक्षयने जवानांसोबत भांगडा देखील केला. याचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.
जवानांना भेटण्याआधी अक्षय कुमारने बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना यांच्यासोबत शहीद झालेल्या जवानांना स्मृतिस्थळी जाऊन आदरांजली वाहिली.
अक्षय सातत्याने करत आहे मदत
अक्षय कुमारला भारतीय सैन्याबद्दल प्रचंड आदर आणि आत्मियता आहे. २०१७ पासून अक्षयने भारतीय सैनिकांसाठी ‘भारत के वीर’ या नावाने एक उपक्रम देखील सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गंत देशाच्या आणि नागरिकांचे रक्षण करताना शहीद झालेल्या पॅरामिलटरी फोर्स, केंद्रीय सशस्त्र दलातील सैनिकांच्या कुटुंबियांना मदत केली जाते.
शाळेला एक कोटींची मदत
या भेटीवेळी अक्षय कुमारने नीरू गावात असलेल्या शाळेसाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या आर्थिक मदतीमधून शाळेची इमारत उभारली जाणार आहे. अक्षयने ही मदत जाहीर केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याचे आभार मानले आहेत.
दरम्यान, अक्षय कुमारच्या देशप्रेमाची झलक त्याच्या अनेक सिनेमांमधून दिसली आहे. सैनिक, बेबी, बॉलिडे, एअरलिफ्ट यांसारख्या देशभक्तीपर सिनेमे त्याने केले आहेत. अक्षयच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे तर ‘बेल बॉटम’, सूर्यवंशी यांसारखे अनेक मोठ्या बॅनरचे सिनेमे त्याच्याकडे आहेत.