अखेर ‘त्या’ पेरू विक्रेत्याचा मृत्यू ; भाव कमी करण्याच्या वादातून झाला होता हल्ला

- Advertisement -

पुणे (विमाननगर)  : पेरू खरेदी करताना भाव कमी जास्त करण्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यातील गंभीर जखमी पेरू विक्रेत्याचा गुरुवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. प्रशांत कल्याण जाधव (वय 28, रा.मांजरी बुद्रुक) याचा या घटनेत दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.  गंभीर घटना 5 फेब्रुवारी रोजी खराडी थिटेवस्ती पेट्रोलपंपाजवळ घडली होती. या खुनी हल्ल्यातील आरोपी मयूर उर्फ महेश रामेश्वर कुरंगळे (वय 30,रा.थिटेवस्ती,खराडी) याला दाखल गुन्हयात या पूर्वीच अटक करण्यात आली आहे. सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
पेरू खरेदी करताना भाव कमी जास्त करण्याच्या वादातून मयूर याने प्रशांत याला त्याच्याच पेरूच्या चाकूने पोटावर वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी चंदननगर पोलीसांनी आरोपी मयूर कुरंगळे याला गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत प्रशांत याला खराडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर 8 फेब्रुवारी पासून हडपसर येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्याच्या पोटावर शस्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्याची प्रकृती सुधारत आली होती मात्र गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रशांत याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

तो पत्नीसह मांजरी येथे राहत होता. सायकल वरून फिरून तो पेरूची विक्री करत उदरनिर्वाह करीत होता. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दाखल गुन्हयात प्रशांत याचा मृत्यू झाल्यामुळे अटक आरोपी विरुध्द कलमवाढ करून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.

- Advertisement -