हायलाइट्स:
- प्रदीर्घ काळानंतर मुक्ता बर्वे पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार
- मुक्ता बर्वे आणि उमेश कामतची नवीन मालिका
- अजूनही बरसात आहे ही मालिका १२ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला
मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या प्रोमोमध्ये मीरा आणि आदी म्हणजेच मुक्ता आणि उमेश यांची अचानक वधु-वर सुचक मंडळाच्या केंद्रा बाहेर भेट होते. त्यांच्या बोलण्यावरून ते दोघे आधी एकमेकांच्या प्रेमात होते हे कळतं. मात्र त्यांचे ब्रेकअप झाल्याने ते आयुष्य पुढे सुरू ठेवत लग्नासाठी नाव नोंदवायला जातात. पण त्याच वधू- वर सूचक मंडळाच्या केंद्रा बाहेर त्यांची भेट होते.
या दोघांचे ब्रेकअप झालेले असले तरीदेखील त्यांच्या मनात एकमेकांबद्दल काही भावना आहेत. त्यांच्या एकूणच बोलण्यावरून आणि त्यांच्या हावभावावरून मालिकेचे कथानक हे ब्रेकअप झालेलं जोडपं अनेक वर्षांनंतर पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात आल्यावर काय होतं यावर आधारलेली असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. आता या दोघांमध्ये पुन्हा प्रेमाची कळी खुलणार का की दोघं आधीच्या निर्णयावर ठाम राहत आपलं आयुष्य वेगवेगळं जगण्याला प्राधान्य देणार याची उत्सुकता प्रेक्षकांना मालिकेचा प्रोमो पाहून निर्माण झाली आहे.
‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका सोनी मराठीवर १२ जुलैपासून प्रसारित केली जाणार आहे. उमेश कामत आणि मुक्ता बर्वे या दोघांचा आपला असा एक खास चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांना छोट्या पडद्यावर परतताना बघून चाहते जाम खुश आहेत. सध्या सोशल मीडियावर या प्रोमोचं आणि मालिकेच्या विषयाचं कौतुक केलं जात आहे.