अडाण कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा पालकमंत्र्यांकडून आढावा – महासंवाद

अडाण कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा पालकमंत्र्यांकडून आढावा – महासंवाद
- Advertisement -




अडाण कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा पालकमंत्र्यांकडून आढावा – महासंवाद

यवतमाळ, दि.२७ (जिमाका) : अडाण नदी प्रकल्पाच्या कालव्यांची विशेष दुरुस्ती केली जात आहे. दुरुस्तीच्या कामातील अडथळे व काम तातडीने होण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल भवन येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला.

यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांच्यासह जलसंपदा, विज वितरण, वन, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अडाण नदी प्रकल्प वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात अडाण नदीवर बांधण्यात आला आहे. धरणास ६५ किमीचा उजवा कालवा आहे. या प्रकल्पांतर्गत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील १०५ हेक्टर तर दारव्हा तालुक्यातील ९ हजार ९६२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. परंतु कालवा नादुरुस्त असल्याने पुर्ण क्षमतेने सिंचन होत नाही.

त्यामुळे कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार दुरुस्तीचे काम १८२ कोटी रुपयांचे आहे. सदर काम तातडीने सुरु करून पुर्ण करण्याच्या सूचना बैठकीत पालकमंत्र्यांनी दिल्या. कालव्याच्या संपादीत जागेवर असलेले विद्युत पोल, डीपी लावलेली असल्याने दुरुस्तीची कामे करतांना अडचण येत असल्याने तारा व डीपी हलविण्यासोबतच त्याची उंची वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

प्रकल्पाच्या कालव्यात झाडे वाढलेली असल्याने दुरुस्तीत अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे वनविभागाने झाडे तोडण्याची परवानगी द्यावी किंवा विभागानेच झाडे तोडावी. कालवा भरावासाठी मुरुम काढण्यासाठी खनिकर्म विभागाने खदान मंजुर करावी. विभागाने कामाची गती वाढवावी. कालव्यातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत लवकरता लवकर पाणी पोहोचेल यादृष्टीने प्रयत्न करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या. दुरुस्ती कामातील अडचणी समजून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी निर्देश दिले.

000







- Advertisement -