Home ताज्या बातम्या अतिवृष्टीग्रस्तांना नवीन निकषानुसार तात्काळ मदत मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू – मंत्री संजय राठोड

अतिवृष्टीग्रस्तांना नवीन निकषानुसार तात्काळ मदत मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू – मंत्री संजय राठोड

0
अतिवृष्टीग्रस्तांना नवीन निकषानुसार तात्काळ मदत मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू – मंत्री संजय राठोड

यवतमाळ दि.१३: यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार  तात्काळ मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही मंत्री संजय राठोड यांनी दिली असून प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा ना. संजय राठोड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वराडे प्रामुख्याने उपस्थित होते.

ना. संजय राठोड यांनी शेती नुकसानी सोबतच इतर शासकीय मालमत्ता हानीचाही आढावा घेतला व झालेल्या नुकसानीचा अहवाल त्या-त्या विभागाने सादर करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना प्राप्त होणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचे व ती रक्कम पूर्णपणे व्यवस्थित जमा झाल्याचे खातरजमा करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यात तापाचे रुग्ण वाढत आहे का याबाबत विचारणा करून वैद्यकीय सुविधा व औषध साठ्याचा आढावा घेतला. आपत्ती काळात चांगले काम करणाऱ्या बचाव पथकातील सदस्यांचा 15 ऑगस्ट रोजी सत्कार करण्याची त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या नुकसानीचे पंचनामे व उपाय योजनांची माहिती सादर केली.  तीन लाख हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असल्याचे व त्यासाठी 205 कोटी निधीची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.