दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर बालकांमध्ये अतिसाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. त्यानूसार आरोग्य विभागाकडून अतिसार संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात.
देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून १० टक्के बालके अतिसारामुळे दगवतात. अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अतिसारामुळे होणारे बाल मृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून पुणे जिल्ह्यात १ जुलै ते १५ जुलै २०२२ या कालावधीत ‘अतिसार नियंत्रण पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे.
अतिसाराची लक्षणे
अतिसार झालेल्या बालकात सौम्य किंवा गंभीर जलशुष्कता, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोळे खोल जाणे, घटा घटा पाणी पिणे, त्वचेचा चिमटा घेतला असल्यास हळूहळू पुर्ववत होणे, सुस्तावलेला किंवा बेशुद्ध अवस्थेत पडणे, स्तनपान टाळणे किंवा बळजबरीने स्तनपान करणे अशी लक्षणे आढळून येतात.
पालकांनी घ्यावयाची काळजी
मातांनी स्वयंपाक करण्यापूर्वी, बालकाला जेवण भरण्यापूर्वी तसेच बालकाची शी स्वच्छ केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. बालकाला अतिसार झाल्याबरोबर (एका दिवसात तीनपेक्षा जास्त वेळा जुलाब होणे) लगेच ओ.आर.एसचे द्रावण द्यावे. अतिसार थांबेपर्यंत द्रावण देत राहावे. पहिल्या अतिसारानंतर बालकाला १४ दिवसांपर्यंत झिंकची गोळी द्यावी. अतिसार होणे थांबले तरी झिंक गोळी देत राहावी. बाळाला स्वच्छ हातानी स्वच्छ व निर्जंतुक पाणी पाजावे.बाळाच्या विष्ठेची लवकर लवकर सुरक्षितप्रकारे विल्हेवाट लावावी.
यादरम्यान जे बाळ स्तनपान करीत असेल त्याला स्तनपान सुरु ठेवावे. अतिसार दरम्यान व नंतरही जास्तीत जास्त स्तनपान द्यावे. बालक अधिक आजारी असेल, स्तनपान करू शकत नसेल, शौचातून रक्त पडत असेल, पाणी कमी पीत असेल किंवा ताप येत असेल, यापैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्यसंस्थेशी, गावातील आशा कार्यकर्ती किंवा ए.एन.एम यांच्याशी संपर्क साधावा.
कार्यक्रमाची रुपरेषा
अतिसार नियंत्रण पंधरवड्याअंतर्गत समाजातील दुर्बल घटक, अस्वच्छ ठिकाणावरील लोकवस्ती या क्षेत्राचा समावेश आहे. शहरी झोपडपट्टी, अतिदुर्गम भाग, डोंगराळ भाग, आदिवासी क्षेत्र, पुरग्रस्त भाग, स्थलांतरीत रस्ते, भटक्या लोकांची वस्ती, वीटभट्टी, बांधकाम सुरु असलेले क्षेत्र, अनाथ बालके, तात्पुरत्या स्वरुपातील वस्ती, रस्त्यावर राहणारी बालके या अतिजोखमीचे क्षेत्राबरोबरच मागील २ वर्षात अतिसाराची साथ लागलेले क्षेत्र पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेले क्षेत्र, छोटी गावे, पाडा, तांडा, वस्ती, झोपडया इत्यादीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
ग्रामीण व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावरील सर्व आशा कार्यकर्ती अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्यामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांच्या पाल्यांना ओ.आर.एस. बनविण्याबाबत, हात धुण्याच्या पद्धतीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ओ.आर.एस व झिंक गोळ्यांच्या वापर कसा करावयाचा याचे प्रत्याक्षिक, ओआरएस व झिंक गोळ्यानचे घरोघरी वाटप, आरोग्य संस्थामध्ये ओ.आर.एस व झिंक कॉर्नर स्थापन करणे, अतिसार झालेल्या कुपोषित बालकावर उपचार या बाबीच्या समावेश आहे. अतिसारापासून बालकांचे सरक्षण करण्यासाठी उपचार प्रक्रियेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
ओ.आर.एस आणि झिंक गोळ्यांचे वाटप
जिल्ह्यात अतिसार नियंत्रण कार्यक्रमासाठी येत्या काळात पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरात ओ.आर.एस. व झिंक गोळ्यांचा वापर तसेच उपलब्धता वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ३ लाख ३२ हजार ३२६ एवढ्या ० ते ५ बालकांना ओ.आर एस व झिंक गोळ्यांचे वाटप आशा कार्यकर्तीमार्फत करण्यात येणार आहे. आशामार्फत गृहभेट देऊन ओ.आर.एस. बनविण्याबाबत २ हजार ८५८ प्रात्याक्षिके करून दाखविण्यात येणार आहे. प्रत्येक उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व जिल्हा रुग्णालय असे एकूण ६७३ ओ.आर.टी कॉर्नर स्थापन करण्यात आले असून या ठिकाणावरून ओ.आर.एस व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी- पावसाळ्यात सर्वांत जास्त आजार दूषित पाण्यामूळे होतात. अतिसार नियंत्रण मोहिमेकरिता लागणारे ३ लाख ७६ हजार १८४ ओआरएस व ८७ लाख १० हजार ४७० झिंक गोळ्यांच्या साठा पुणे जिल्ह्यात उपलब्ध आहे. अतिसार संसर्गाबाबत लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील अर्भक व बालमुत्यू कमी करण्यासाठी ही मोहिम यशस्वापणे राबविण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे.
जिल्हा माहिती कार्यालय, पुणे