पिंपरी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली. यातून पीडितेने मुलीला जन्म दिला. देहूरोड येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी तरुणास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन उर्फ हानी पासवान (वय १९, रा. आदर्शनगर, देहूरोड, मुळ रा. उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीची आई घरकाम करते. २०१८ मध्ये असेच एका ठिकाणी घरकामासाठी आई गेली असता पीडित मुलगीही तेथे गेली होती. तिची आई घरात काम करीत होती. पीडीत मुलगी बाहेर होती. त्यावेळी आरोपी सचिन पासवान व पीडित मुलीची भेट झाली. तीन महिन्यांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी अल्पवयीन पीडित मुलगी व तिची मैत्रीण आरोपी सचिन पासवान याला भेटले. त्यानंतर पीडित मुलीची मैत्रीण तेथून निघून गेली. आरोपी सचिन याने पीडित मुलीला तेथे काम सुरू असलेल्या एका इमारतीत घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने कोणास काहीही सांगितले नाही. त्यानंतर आरोपी सचिन याने एक महिन्यानंतर पीडित मुलीवर दोन-तीन वेळा अत्याचार केला. वडील तापट स्वभावाचे असल्याने पीडित मुलीने याबाबत कोणालाही काहीही सांगितले नाही. अत्याचारातून पीडित मुलगी गरोदर झाली. पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात घेऊन गेली. तेथील महिला डॉक्टर पीडित मुलगी व तिच्या आईला देहूरोड पोलीस ठाण्यात घेऊन गेली. त्यानंतर छावणी रुग्णालयात व तेथून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अल्पवयीन पीडितेने मुलीला जन्म दिला.
याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ११) रात्री पावणेअकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
अत्याचारातून गरोदर राहिलेल्या अल्पवयीन पीडितेने दिला मुलीला जन्म
- Advertisement -