Home गुन्हा अनधिकृत इमारतीचा भाग कोसळून चिमुकलीने गमावला जीव, जबाबदार कोण?

अनधिकृत इमारतीचा भाग कोसळून चिमुकलीने गमावला जीव, जबाबदार कोण?

0

नालासोपारा : विरार पूर्वेकडील कोपरी परिसरातील नित्यानंद धाम नावाच्या चार मजली अनधिकृत इमारतीचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेत एका 4 वर्षाच्या चिमुकलीचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

विरार पूर्व कोपरी गावातील नित्यानंद नगर परिसरात अनेक बेकायदा इमारतींचे बांधकाम झाले आहे. त्यातीलच एक 5 ते 6 वर्ष जुन्या नित्यानंद धाम या चार मजली इमारतीच्या टेरेसचा भाग आणि चौथ्या मजल्यावरील सज्जा अचानक रात्री ८ वा. च्या सुमारास खाली कोसळला. यावेळी मोठा आवाज झाला तसंच इमारतीचा भाग कोसळल्याने धुळीचे साम्राज्य पसरले होते. या धक्कादायक घटनेमध्ये 4 वर्षाच्या भूमी पाटील हीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना घडली तेव्हा चौथ्या मजल्यावर १० कुटुंबं अडकली होती. इमारतीच्या भाग कोसळल्याने या मजल्यावरील रहिवाशांना मार्गात अडथळा येत होता. अखेर अग्निशमन पथकाची वाट बघण्याआधीच स्थानिकांनी बचावकार्याला सुरुवात केली. तसेच शेजारील इमारत सुद्धा कोसळण्याची भीती असल्याने रहिवाशांनी तातडीने घर सोडून मोकळ्या परिसरात धाव घेतली.

इमारत आणि इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेनंतर आमदार क्षितिज ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले असून अजून कोणी आहे का याचा शोध घेत आहेत. दरम्यान, चिमुकल्या भूमीच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वसई-विरार महानगरपालिकेने शेकडो इमारती धोकादायक जाहीर केल्या होत्या. मात्र, ही इमारत धोकादायक यादीत आहे का हे समजू शकलेलं नाही. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.