अनिल कपूरच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरला ‘हा’ चित्रपट, फोटो केला शेअर

- Advertisement -

बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता अनिल कपूर याला इंडस्ट्रीमध्ये 40 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. वयाच्या साठीतही विशीच्या अभिनेत्याला लाजवेल असा अभिनय करणाऱ्या अनिल कपूरने सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल केले. स्ट्रगल सुरू असताना कारकीर्दीत मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटाचा एक फोटो अनिल कपूर यांनी शेअर केला आहे. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वो सात दिन’ या चित्रपटातील भूमिकेमुळे आपल्या कारकीर्दीला वेगळे वळण मिळाल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले.

ट्विटरवर एका युजरने अनिल कपूर यांच्या कारकीर्दीत मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटाचा फोटो ट्वीट केला. या फोटोमध्ये अनिल कपूर मास्टर राजूसोबत उभा असल्याचा दिसत आहे. ‘तो चित्रपट ज्याने अनिल कपूर याच्या कारकीर्दीला वेगळे वळण दिले’, असे कॅप्शन या फोटोला युजरने दिले. चाहत्याचा हा फोटो अनिल कपूर यांनी रिट्विट केला आणि जुन्या दिवसांची आठवणी ताज्या केल्या.

‘1977 ते 1983 पर्यंत मी इंडस्ट्रीमध्ये खूप स्ट्रगल केले. मला फक्त एका अशा चित्रपटाची गरज होती जो माझ्या कारकीर्दीला पुढे नेईल. मला ‘वो सात दिन’ चित्रपटात संधी मिळाली आणि तो मैलाचा दगड ठरला. यातील भूमिकेमुळे माझे आयुष्य बदलून गेले. या चित्रपटानंतर माझे स्वप्न साकार झाले. मी आत्ता जे काम करत आहे त्यासाठी देवाचे आभार’, असे अनिल कपूर यांनी ट्विटरवर म्हटले.

वो सात दिन
दरम्यान, ‘वो सात दिन’ हा चित्रपट 23 जून, 1983 साली प्रदर्शित झाला. बापू यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, नसरुद्दीन शहा, निळू फुले, आशालता, जगदिप यांनी भूमिका साकारली होती. चित्रपटातील गाण्यांना लक्ष्मिकांत-प्यारेलाल या जोडीने संगीत दिले होते.

- Advertisement -