मुंबई, दि. 29 : औरंगाबाद विभागातील जालना, बीड व औरंगाबाद येथील भगरीपासून विष बाधेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भगर विक्री करणाऱ्या सर्व उत्पादक व विक्रेत्यांकडील प्रति जिल्हा दहा नमुने तपासणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
मंत्री श्री. राठोड यांनी विभागाच्या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अन्न व औषध तसेच सौंदर्य प्रसाधने मध्ये गैरप्रकार करणाऱ्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्याच्या मंत्री श्री.राठोड यांनी सूचना दिल्या. औषध विभागातील सर्व कंपन्या जागतिक स्तरावरील तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतात किंवा कसे याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कॅन्सर, डायबिटीज यावरील औषध उत्पादक कंपन्या त्यांचेकडील कर्मचारी वर्ग यांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना, कंपनीमधील औषधाचा दर्जा हा केंद्र शासनाने नेमून दिलेल्या संगणक प्रणाली प्रमाणे मशीनरीचा वापरतात काय हे तपासण्याच्या सूचना यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
अन्न विभागामध्ये भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाने परवानगी दिलेल्या अन्न उद्योगामधील उत्पादन प्रकरणात तपासणी करता येत नाही अशी अडचण अधिकाऱ्यांनी उपस्थित केली. अशा सर्व पदार्थांच्या वितरक व विक्रेते यांचेकडील नमुने कायदेशीर पद्धतीने तपासण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाने अलीकडे पारीत केलेल्या अन्नपदार्थ, सर्व प्रकारचे पेये यामध्ये तपासण्या काटेकोर होतील याकडे विभागाने लक्ष देण्याचे निर्देश दिले.
प्रतिबंधित माल येणारे आंतरराज्य सिमा, टोल नाके, गोदाम याबाबत तपासणी करुन प्रतिबंधित मालाची वाहतूक करणारे मोठे व्यापारी, वाहतुकदार यांना शोधून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
००००
अर्चना शंभरकर/विसंअ/29.9.22