Home ताज्या बातम्या अन् कार फ्लायओव्हरवरुन खाली कोसळली; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ

अन् कार फ्लायओव्हरवरुन खाली कोसळली; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ

0

हैदराबाद: अपघाताच्या घटना या सातत्याने समोर येत असतात. हैदराबादमधील रायदुर्गम परिसरात असलेल्या फ्लायओव्हरवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बायोडायव्हर्सीटी जंक्शनजवळ असलेल्या एका फ्लायओव्हरवर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट फ्लायओव्हरवरचं रेलिंग तोडून खाली कोसळली. ही संपूर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला असून तो जोरदार व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या रायदुर्गम परिसरात शनिवारी (23 नोव्हेंबर) हा अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बायोडायव्हर्सीटी फ्लायओव्हरवरून एक लाल रंगाची कार जात असताना कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार फ्लायओव्हरवरुन खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. 

सोशल मीडियावर अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्यात यावे असे आदेशही देण्यात आले आहेत. हैदराबादमधील बायोडायव्हर्सीटी जंक्शनजवळ फ्लायओव्हर हा अपघातानंतर तीन दिवस बंद करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या निवारी जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. 

निवारी जिल्ह्यातील ओरछाजवळ समोरून भरधाव वेगाने  येणाऱ्या ऑटोरिक्षाला कारची धडक बसू नये या प्रयत्नात कारचा अपघात झाला. कारमधून 5 जण प्रवास करत होते. ऑटोरिक्षाची कारला धडक बसली. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार नदीत कोसळली. कारमधील काही प्रवासी बाहेर आले. मात्र त्याचवेळी गाडीमध्ये एक लहान मुलगा देखील होता. चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी कारमधील एका व्यक्तीने पाण्यातून मुलाला नदीवरील पुलावर उभ्या असेलल्या लोकांच्या दिशेने फेकले मात्र मुलगा नदीत पडला. पुलावर उभ्या असलेल्या लोकांनी देखील घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कार अपघातातील लोकांना मदतीचा हात दिला. लहान मुलगा पाण्यात पडलेला पाहताच पुलावर उपस्थित असलेल्या लोकांपैकी काहींनी नदीत उडी मारली आणि वाहून जाणाऱ्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर कारमध्ये अडकलेल्या पाचही जणांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.