अफलातून… ड्वेन ब्राव्हाने एका हाताने मारलेला चेंडू थेट स्टेडियमबाहेरच गेला, व्हिडीओ झाला व्हायरल

अफलातून… ड्वेन ब्राव्हाने एका हाताने मारलेला चेंडू थेट स्टेडियमबाहेरच गेला, व्हिडीओ झाला व्हायरल
- Advertisement -

सेंट लुसिया : वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विंडीजने बाजी मारली. आणि ऑस्ट्रेलियाला 56 धावांनी नमवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. शिमरॉन हेटमायर 61 आणि ड्वेन ब्राव्होने 47 धावांची खेळी केल्याने विंडीजने 20 षटकात 4 बाद 196 असे आव्हानात्मक लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले. सलग दुसऱ्या सामन्यात हेडन वॉल्शने तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. परिणामी ऑस्ट्रेलियाला 140 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत घेतलेला गोलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरला.

विंडीजचा संघ सध्या तुफान फॉर्मात असल्याचे दिसून येते. हेटमायर आणि ब्राव्हो यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या जोडीने कांगारु फलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. दरम्यान, ब्राव्होने एका हाताने मारलेल्या षटकाराची सध्या सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. एश्टन एगरच्या गोलंदाजीवर ब्राव्होने मारलेला हा षटकार स्टेडियमबाहेर गेला. 13 व्या षटकातील चौथा चेंडू एगरने अखूड टप्प्यावर टाकला. तो ब्राव्होने जोरदार टोलवला. ब्राव्हाने एका हाताने लावलेला षटकार स्टेडियमच्या पलीकडे गेला.

दरम्यान, विंडीजच्या डावाची सुरवात चांगली झाली नाही. एविन लुईसच्या जागी संघात स्थान मिळालेल्या फ्लेचर 9 धावा काढून तंबूत परतला. ख्रिस गेलचा फ्लॉप शो या सामन्यातही कायम राहिला. 16 चेंडूत 13 धावा काढून गेलही बाद झाला. त्यानंतर ब्राव्हो आणि हेटमायर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचली. 36 चेंडूत 61 धावांची तुफानी खेळी करून हेटमायर धावबाद झाला. दुसरीकडे ब्राव्होने 34 चेंडूत 47 धावांची नाबाद खेळी साकारली. शेवटच्या काही षटकात फलंदाजीसाठी आलेल्या आंद्रे रसेलने 8 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या साहाय्याने 24 धावा कुटल्या.

गेल्या सामन्यात गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघात खळबळ माजविणाऱ्या ओबेड मेकॉयला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी शेल्डन कॉट्रेलला संधी देण्यात आली. तसेच सलामीवीर एविन लुईसच्या जागी फ्लेचरला खेळविण्यात आले होते.

Source link

- Advertisement -