Home ताज्या बातम्या ‘अभिनेता शाहरुख खान पुढे सरसावला त्या’ चिमुकल्यांची जबाबदारी घेण्यासाठी

‘अभिनेता शाहरुख खान पुढे सरसावला त्या’ चिमुकल्यांची जबाबदारी घेण्यासाठी

शफीक शेख:-

मुंबई – रेल्वे प्लॅटफॉर्मवर निपचित पडलेल्या महिलेच्या शेजारी खेळणा-या दोन मुलांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. दुर्दैवाची गोष्ट ही की ती महिला मृत पावलेली होती आणि त्याची त्या चिमुकल्यांना काहीच जाणीव नव्हती. त्यांना आपली आई झोपली आहे असेच वाटत होते. हा व्हिडीओ अभिनेता शाहरुख खानने पाहिल्यानंतर तो या मुलांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.त्याच्या ‘मीर फाउंडेशन’ने या मुलांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मीर फाऊंडेशनने या संदर्भात एक ट्विट करत या चिमुकल्यांना मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे आम्ही या मुलांची जबाबदारी घेतोय, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘व्हिडीओमध्ये आईला उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चिमुकल्यांपर्यंत पोहोचविलं त्यासाठी आभार. आम्ही या मुलांची जबाबदारी घेत आहोत. सध्या ही दोन्ही मुलं त्यांच्या आजी-आजोबांसोबत सुरक्षित आहे’,असं ट्विट मीर फाउंडेशनने केलं आहे.

काही दिवसांपूर्वी बिहारच्या मुजफ्फरपूरमधील रेल्वे प्लॅटफॉर्मवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. अहमदाबादमधून मजुरांसाठी सोडण्यात आलेल्या स्पेशन ट्रेनने अरविना खातून (३५ वर्ष) ही महिला आपल्या दोन मुलांसह प्रवास करत होती. तिचा २५ मे रोजी मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकात दुर्दैवी अंत झाला.

लॉकडाउनमुळे ओढावलेल्या या संकटकाळात शाहरुख खान त्याला शक्य होईल त्याप्रमाणे गरजूंची मदत करत आहे. त्याने कोलकाता नाइट राइडर्स, रेड चिलीज एंटरटेनमेंट, मीर फाउंडेशन आणि रेड चिलीज वीएफएक्स या कंपनीअंतर्गंत अनेकांना मदत केली आहे.

तसंच पंतप्रधान मदतनिधीमध्ये आर्थिक रक्कम जमा केली आहे. तसंच २५ हजार पीपीई किटही दिल्या आहेत.