अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थीनीस अश्लिल मेसेज पाठविणाऱ्यास गुजरातमधून अटक
पुणे शहरात अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीस अश्लिल मेसेज पाठवून तिला मानसिक त्रास देणाऱ्यास समर्थ पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या. आरोपीने यापूर्वीही कराड येथील महिलेस याच पद्धतीने अश्लिल मेसेज पाठविल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले.
संदिप सुखदेव हजारे (वय 29, रा. राजकोट, गुजरात, मुळ रा. आंबवडे, खटाव, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय विद्यार्थीनीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी शहरातील नामांकीत अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. फिर्यादी विद्यार्थीनीस व्हॉटस्अप, फेसबुकवर एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला होता. तिची छायाचित्रे व्हॉट्सअपच्या प्रोफाईलला ठेवून मी तुझ्यावर प्रेम करतो, असे सांगत तिच्याशी चॅटींग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्याने फिर्यादीस अश्लिल मेसेज पाठविण्यास सुरूवात केली. सातत्याने घडणाऱ्या या प्रकारामुळे विद्यार्थीनीस मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होऊ लागला. या सर्व प्रकाराला कंटाळून तिने समर्थ पोलिस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दाखल केली. या प्रकरणाची समर्थ पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली.
पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलिस कर्मचारी राजस शेख, अनिल शिंदे, साहिल शेख, गणेश कोळी यांनी संबंधीत व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला. त्यावेळी हा मोबाईल क्रमांक एका महिलेचा असून तो क्रमांक तिचा पती वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र तिचा पती संदिप हजारे हा गुजरातमधील राजकोट येथे केटरींगचे काम करत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांच्या पथकाने गुरूवारी राजकोट येथे जाऊन तेथील बेदीपुरा परिसरातून त्यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच यापुर्वी कराड येथील एका महिलेसही याच पद्धतीने अश्लिल मेसेज पाठवून त्रास दिल्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे