मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने, अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रकियेस १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुदतवाढीसंदर्भात विद्यार्थी, पालकांनी केलेल्या मागणीसंदभार्तील सूचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनाही दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
वैद्यकीय प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या बैठकीत या मुदतवाढीला मंजुरी घेण्यासंदभार्तील प्रस्ताव आयुक्त आनंद रायते यांनी दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वैद्यकीय प्रवेश १८ आॅगस्टपर्यंत पूर्ण करायचे आहेत. मात्र, राज्यभरातील पूरस्थिती लक्षात घेऊन मुदतवाढ मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयास सरकारने विनंती करावी व या संदभार्तील प्रस्ताव प्राधिकरणाने देण्यासंदभार्तील चर्चा बुधवारच्या बैठकीत झाली आणि अखेर वैद्यकीय प्रवेशांना १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली. विद्यार्थी, पालकांच्या माहितीसाठी या संदर्भातील परिपत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केल होते.
यापुढे मुदतवाढ नाही
एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दुसरी निवड यादी जाहीर केली आहे. प्रवेश घेण्यासाठी बुधवारी अंतिम तारीख होती. आता या मुदतीत वाढ करण्यात आल्याने विद्यार्थी १० तारखेपर्यंत प्रवेश घेऊ शकतील. तर बीएएमएस / बीएचएमएस / बीयूएमएसच्या पहिल्या फेरीतील प्रवेशांसाठी १० आगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याचे परिपत्रकाद्वारे जारी करण्यात आले आहे. यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ या प्रवेशांसाठी देण्यात येणार नसल्याचेही परिपत्रकात सीईटी सेलने नमूद केले आहे.