Home शहरे अकोला अमरावतीच्या पर्यटनाला वडाळी तलावाच्या विकासामुळे चालना मिळेल – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावतीच्या पर्यटनाला वडाळी तलावाच्या विकासामुळे चालना मिळेल – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0
अमरावतीच्या पर्यटनाला वडाळी तलावाच्या विकासामुळे चालना मिळेल – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 20 : वडाळी तलाव परिसराच्या विकासामुळे अमरावती जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळेल. तसेच याद्वारे जिल्ह्यात एक महत्त्वाची पर्यटन सुविधा निर्माण होणार आहे, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

अमरावती महापालिका क्षेत्रातील वडाळी तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबत आज महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक झाली.

एस.आर.पी.कॅम्प, वनविभाग व महापालिका यांच्या जमिनी व नैसर्गिक संसाधने परिपूर्ण असलेले दोन तलाव व नैसर्गिक सौंदर्य लाभलेला भूभाग असलेल्या याठिकाणी महापालिकेकडून पर्यटन उद्यान निर्माण करण्यात येणार आहे. वडाळी तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

गेली अनेक वर्ष वडाळी तलाव परिसराच्या विकासाचा प्रश्न प्रलंबित होता. आजच्या  बैठकीमुळे वडाळी तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबतचा प्रश्न मार्गी लागला आहे. लवकरच या ठिकाणी विकासाची कामे सुरु होतील. वडाळी तलाव परिसराच्या विकासामुळे अमरावती जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळेल. तसेच याद्वारे जिल्ह्यात एक महत्त्वाची पर्यटन सुविधा निर्माण होणार आहे, असा विश्वास मंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी व पर्यावरणविषयक बाबींसंदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत करण्यात आली आहे. अमरावती महापालिका क्षेत्रातील वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्मितीसाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मंत्री ॲड. ठाकूर यांनी केली.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले,अमरावती जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेमार्फत विकास आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा, त्यानुसार नियोजन विभाग, वन विभाग, पर्यटन संचालनालय, पर्यटन विकास महामंडळ आदी विभागामार्फत टप्याटप्याने तलाव क्षेत्राचा विकास करण्यात यावा, वडाळी तलावाचा विकास आणि सुशोभीकरण करताना वन विभागाच्या जागेत इको टुरिझम अंतर्गत ऑक्सिजन पार्क तयार करणे, तलाव क्षेत्रात बोटिंग क्लब, परिसरात जेट्टी, उद्यान आदी प्रकल्प उभारण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर, पर्यटन विभागाच्या उपसचिव उज्ज्वला दांडेकर नगरसेवक दिनेश बूब, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे अमरावती महापालिका आयुक्त डॅा. प्रवीण आष्टीकर व अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर आदी मान्यवर उपस्थित होते.

००००