अमरावतीतील CRPF जवान शहीद, नव्या घरात प्रवेश करण्याआधीच मृत्यूनं गाठलं

- Advertisement -

अमरावती: नजीकच्या माणिकपूर येथील रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे जवान पंजाब जनीराम उईके (४८) यांना जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तादरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागल्याने पंजाब उईके यांना वीरमरण आले. ते २००२ मध्ये सीआरपीएफमध्ये दाखल झाले होते. नागपूर मुख्यालय अंतर्गत सीआरपीएफच्या सेकंड बटालियनमध्ये त्यांनी सुकमा येथे सेवा दिली. त्यांची नुकतीच येथून जम्मू-काश्मीरमध्ये बदली झाली होती. दोन वर्षांनी त्यांच्या सेवेचा बाँड संपणार होता. वरूड येथे त्यांनी नुकतेच घर घेतले होते.

एकूण चार भावांपैकी पंजाब उईके यांचा क्रमांक दुसरा आहे. त्यांच्या पश्चात आई रखमाबाई (७०), तीन भाऊ, पत्नी चंद्रा (४२), नववीत शिकणारा मुलगा व पाचवीत शिकणारी मुलगी आहे. अत्यंत मितभाषी असलेले पंजाब उईके यांचा माणिकपूर परिसरात चांगला संपर्क होता. गावी आल्यानंतर वॉटर कप स्पर्धेसारख्या सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांचे पार्थिव बुधवारी रात्रीपर्यंत वरूडला आणले जाणार असून, तेथे शहिदाची रॅली काढली जाणार आहे. 

आज अंत्यसंस्कार 
वरूड या तालुकास्थळी शहीद पंजाब उईके यांच्या पार्थिवाला रॅली काढून सन्मान दिल्यानंतर ३० जानेवारी रोजी दुपारी मूळ गावी माणिकपूर येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती आहे.

- Advertisement -