
मुंबई दि.१७: अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि कोणतीही आरोग्य सुविधा कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे किंवा तांत्रिक कारणास्तव थांबू नये, यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका सेवेसंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आरोग्यसेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, आरोग्यसेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक ठाणे परिमंडळ, जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर, शल्यचिकित्सक तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका सेवेतील तांत्रिक अडचणी आणि इतर प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊन मंत्री आबिटकर म्हणाले स्पर्श प्रणालीमधील त्रुटी, चिखलदरा आणि धारणी येथील इंधन पुरवठ्याबाबतचे प्रश्न तसेच रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेऊ. धारणी आणि चिखलदरा सारख्या दुर्गम भागात आरोग्य सेवा विनाखंड सुरू राहण्यासाठी मानधनाचे प्रलंबित विषय तातडीने निकाली काढण्यात येतील तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि स्त्री रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.
तपोवन कुष्ठरोग संस्थेच्या अहवालाबाबत आणि तेथील सुधारणांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल तसेच जनसामान्यांच्या आरोग्याशी निगडित हे सर्व प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून, एक सुदृढ आणि आरोग्यसंपन्न अमरावती घडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला.
०००




















WhatsApp