Home ताज्या बातम्या अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात होणार ‘सिताफळ हब’ – डॉ. अनिल बोंडे

अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात होणार ‘सिताफळ हब’ – डॉ. अनिल बोंडे

मुंबई : शास्त्रोक्त पद्धतीने सिताफळाची लागवड, संगोपन, प्रक्रिया तसेच विपणन व्यवस्थेचा विकास करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात खेड (ता. मोर्शी) आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सिताफळ हब विकसित करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे निर्देश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.

          सिताफळाच्या सर्वांगिण विकासाच्या अनुषंगाने डॉ. बोंडे  यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, सिताफळ हे पीक विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणू शकते. सिताफळाच्या रोपे व झाडांना वन्यप्राणी खात नसल्याने इतर पिकांच्या तुलनेत याची लागवड फायदेशीर ठरु शकते. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विदर्भात सिताफळ हब निर्माण करुन शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळ लागवड, फळांची साठवणूक, गर काढणे, त्यावर प्रक्रिया, रोपवाटिका विकास, ठिबक सिंचन पद्धती, विपणन व्यवस्थेचा विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करावा. सिताफळ लागवड अनुदानाबाबतचे पॅकेज निश्चित करण्यासाठी कृषी विद्यापीठाची  मदत घ्यावी, असेही निर्देश डॉ.बोंडे यांनी दिले.

          बैठकीस कृषी विभागाचे सहसचिव अशोक आत्राम, कृषी सहसंचालक (फलोत्पादन) शिरीष जमदाडे, संशोधन संचालक व्ही. के. खर्चे, सिताफळ महासंघाचे सचिव अनिल रा. बोंडे, अमरावतीचे  जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी अ. म. इंगळे, फलोत्पादन उपसंचालक सु.वि. भालेराव आदी उपस्थित होते.