Home बातम्या अमेरिकेतून १४५ भारतीयांची मायदेशी रवानगी, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत केली पाठवणी

अमेरिकेतून १४५ भारतीयांची मायदेशी रवानगी, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत केली पाठवणी

0

नवी दिल्ली: अमेरिकेसारख्या अतिश्रीमंत देशातील उच्च राहणीमानाचे अनेकांना आकर्षण आहे. त्यासाठी अमेरिकेत जाऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळवावी, तिकडेच स्थायिक व्हावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. मात्र अमेरिकेचे हे आकर्षण आणि तेथील नोकरीचे स्वप्न १४५ भारतीयांसाठी दु:स्वप्न ठरले आहे. अमेरिकेत अवैधरीत्या घुसल्याच्या आरोपाखाली या भारतीय नागरिकांना अमेरिकेतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यांची भारतात परत पाठवणी केली आहेत . अनेक दिवसांची उपासमार्, फाटलेले कपडे आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत हे भारतीय नागरिक बुधवारी सकाळी विमानातून  दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

या तरुणांपैकी बहुतांश तरुण हे उच्चशिक्षित आहेत. अमेरिकेत जाऊन काम करणे हे त्यांचे स्वप्न होते. अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी एजंटांना सुमारे २५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम एजंटांना दिली होती. एजंटांमार्फत अमेरिकेत पोहोचलेल्या या तरुणांपैकी काही जणांना तर काम करण्यासही सुरुवात केली होती. मात्र अमेरिकेत सुखी जीवनाचे स्वप्न रंगवत असतानाचा तेथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अवैधरीत्या अमेरिकेत घुसल्याचा आरोप ठेवत या तरुणांना पकडले. त्यानंतर अवैधरीत्या देशात घुसणाऱ्या व्यक्तींना ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिटेन्शन सेंटरमध्ये या तरुणांची रवानगी करण्यात आली. अखेरीस सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या तरुणांना मायदेशी पाठवण्यात आले.

भारतात परतले तेव्हा या तरुणांची स्थिती फारशी चांगली नव्हती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळार फाटलेले कपडे आणि उदास चेहऱ्याने ते बाहेर येत होते. अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या १४५ जणांमध्ये तीन भारतीयांचाही समावेश होता. या सर्वांना अमेरिकेतील अॅरिझोना येथून माघारी धाडण्यात आले होते.  १४५ भारतीयांबरोबरच २५ बांगलादेशी नागरिकांनाही परत पाठवण्यात आले होते.

दरम्यान, अमेरिकेतील डिटेन्शन कॅम्पमध्ये या भारतीयांवर विविध प्रकारचे निर्बंध लादले गेले होते. तिथे खाण्यापिण्याची अबाळ होती. त्यामुळे हे भारतीय नागरिक मानसिकदृष्ट्या खचले होते. दरम्यान, डिटेंशन सेंटरमध्ये आपल्याला नावाने नाहीतर नंबरवरून हाक मारली जात असे. आमच्यासोबत गुन्हेगारांसारखे वर्तन केले जाई. कधी कधी उपाशी राहावे लागे, कारण जेवणात बीफ दिले जायचे, अशी माहिती अमेरिकेतून परत पाठवलेल्यांपैकी काही जणांनी दिली.

इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला का ताब्यात घेतले आहे हे काही आठवड्यांपर्यंत सांगण्यात आले नव्हते. अखेर अमेरिकेत येण्यासाठी आणि येथे राहण्यासाठी योग्य ती कागदपत्रे आमच्याकडे नाहीत, अशी माहिती आम्हाला अनेक दिवसांनंतर देण्यात आली, असे या तरुणांपैकी एकाने सांगितले.