“काय रे, अलिबागवरून आलायस का?”, या डायलॉगवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाराजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला.
‘अलिबागहून आलायस का?’ किंवा ‘अलिबाग से आया है क्या??’ हे डायलॉग ‘अपमानजनक’ असल्याच्या भावनेपोटी अलिबागमधील सातीर्जे गावचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी अॅड. रघुराज देशपांडे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सिनेमा, नाटके, टीव्ही मालिका, सार्वजनिक सादरीकरणे, स्टँडअप कॉमेडी इत्यादींमध्ये या डायलॉगचा वापर करण्यास बंदी घालावी, अशी विनंती या याचिकेद्वारे केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाराजोग आणि न्या. जामदार यांच्या खंडपीठानं आज निर्णय दिला. ‘विनोद हे सर्व समुदायाच्या लोकांवर होतच असतात. ते फारसे मनावर घ्यायचे नसतात,’ असे नमूद करत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.