Home ताज्या बातम्या अलिबाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा अधिग्रहणाच्या कामाला गती देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना

अलिबाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा अधिग्रहणाच्या कामाला गती देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना

0

मुंबई : अलिबाग येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा अधिग्रहणाच्या कामाला गती देण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रायगड येथील वैद्यकीय महाविद्यालय जागेसंदर्भात बैठक झाली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, रायगड येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी अंदाजे 25 एकर जागेची आवश्यकता आहे. रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 6 हेक्टर जागा आतापर्यंत उपलब्ध झाली असून ती जागा देण्यास त्यांनी सहमती दर्शविली आहे. तसेच उर्वरित जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अखत्यारित असल्याने जागा अधिग्रहणाबाबतची कार्यवाही महसूल विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या समन्वयाने करुन घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

रायगड येथील अलिबाग येथे केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांप्रमाणे 100 प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, आमदार अवधूत तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वैद्यकीय ‍शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, आदी उपस्थित होते.