अवैध बांधकामांना करोनाकाळात पेव

अवैध बांधकामांना करोनाकाळात पेव
- Advertisement -

म. टा. विशेष प्रतिनिधी

लॉकडाउन कालावधीत आणि लॉकडाउन शिथिल केल्यानंतर मुंबईत अवैध बांधकामे जोरात सुरू आहेत. मार्च, २०२० ते फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत महापालिकेकडे अवैध बांधकामांच्या तब्बल १३ हजारांहून अधिक तक्रारी आल्या. वर्षभरात एकूण साडेनऊ हजार अवैध बांधकामांची नोंद झाली आहे. त्यापैकी फक्त ४६६ बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मालाड पी-उत्तर विभागात ४२९ तक्रारी दाखल झाल्या असून ३४२ अवैध बांधकामप्रकरणी फक्त ६२ प्रकरणात कारवाई झाली आहे.

करोना काळात मुंबईत किती अवैध बांधकामांच्या तक्रारी आल्या, कितींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, याची माहिती माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पालिकेकडून घेतली आहे. पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात ऑनलाइन प्रणालीवरील २५ मार्च, २०२०पासून २८ फेबुवारी, २०२१पर्यंतची माहिती देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागासह सर्वच विभागांतील कर्मचारी करोना उपाययोजनांशी संबंधित कामांमध्ये व्यग्र होते. त्याचा फायदा उठवत भूमाफिया, झोपडीदादांनी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली आहेत. त्यावर कारवाई होत नसल्याने नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकांमध्ये प्रशासनावर वेळोवेळी टीकेची झोड उठली आहे.

पूर्व उपनगरातील कुर्ला, गोवंडी, मानखुर्द या भागांतून अवैध बांधकामांच्या सर्वाधिक म्हणजे सुमारे १२०० ते ३२५० तक्रारी आल्या आहेत. कुर्ला परिसरात साकीनाका येथील खैरानी रोड भागात सर्वांत जास्त अवैध बांधकामे आहेत. फरसाण कारखाना, अवैध गॅरेज, गोदामे यांची संख्या मोठी आहे. या भागात गेल्या दोन वर्षांत मुंबईतील सर्वाधिक आगी लागल्या आहेत. काळबादेवी, चंदनवाडी, भुलेश्वर परिसराचा समावेश असलेल्या सी विभागातून ६१४ तक्रारी आल्या असून फक्त २४ प्रकरणी कारवाई झाली आहे.

इमारत दुर्घटना झालेल्या मालाड मालवणी येथील गेट क्रमांक आठ परिसरात तसेच जवळच्या आंबोजवाडीमध्ये मोठी झोपडपट्टी आहे. येथे अवैध बांधकामांचे पेव फुटले आहे. घरांवर तीन ते चार मजले अवैधरित्या बांधण्यात आले आहेत. पालिकेच्या पी-उत्तर विभागात हा परिसर येत असून वर्षभरात येथून अवैध बांधकामांच्या ४२९ तक्रारी आल्या असून फक्त ६२ प्रकरणी कारवाई झाली.

सर्वाधिक अवैध बांधकामे

विभाग तक्रारी अवैध बांधकामे कारवाई

१. कुर्ला एल : ३,२५१ २,००२ ५२

२. चेंबूर एम-पूर्व : १,१९४ १,१७४ ८

३. चेंबूर एम-पश्चिम : १,२१३ ६८७ ३३

४. विक्रोळी एस : ५८९ ५५२ ८

५. कांदिवली : आर-उत्तर ५९५ ५०५ १४


विभाग तक्रारी अवैध बांधकामे कारवाई

सँडर्हस्ट रोड बी ३६८ १८२ २

काळबादेवी सी ६१४ ३८९ २४

भायखळा ई ५७९ ४३६ ०

परळ एफ-दक्षिण २९७ २१४ ३

वांद्रे एच-पूर्व ४५१ २३२ ११

वांद्रे एच-पश्चिम ५२५ ४२९ २१

अंधेरी के-पूर्व ४४१ ३९५ ३३

अंधेरी-के पश्चिम ३४२ ३०२ ५८

मालाड पी-उत्तर ४२९ ३४२ ६२

गोरेगाव पी-दक्षिण ४१६ २३३ ४

बोरीवली आर-दक्षिण ३४८ ३१४ ७५

दहिसर आर-मध्य ३९८ १९६ ४

करोना काळात पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी विविध उपाययोजनांच्या कामात व्यस्त होते. त्याचा फायदा उठवत अवैध बांधकामे वाढल्याच्या तक्रारी आहेत. या बांधकामांवर कारवाई करण्याचे अधिकार प्रभाग कार्यालयांना दिले आहेत. २४ विभागांसाठी २४ पदनिर्देशित अधिकारी नेमण्यात आले आहेत.

– अनंत भागवतकर, सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग, मुंबई महापालिका

Source link

- Advertisement -