Home गुन्हा अवैध हातभट्टी दारू धंद्यांवर न्हावरे दुरक्षेत्र पोलिसांची कारवाई

अवैध हातभट्टी दारू धंद्यांवर न्हावरे दुरक्षेत्र पोलिसांची कारवाई

0

न्हावरे (प्रतिनिधी) :- न्हावरे गाव आणि परिसरातील काही अवैध हातभट्टी दारू धंद्यांवर न्हावरे दुरक्षेत्र पोलिसांनी काल रात्री (दि.२०) कारवाई केली. मात्र, दारू धंदेवाले पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. त्यांना पकडून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत करवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती न्हावरे पोलिसांनी दिली.

परिसरातील आलेगाव फाटा आणि शेंडगेवस्ती येथील दारू धंदेवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या राहत्या घरातून ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. राजू विश्वनाथ जाधव (रा.आलेगाव फाटा, न्हावरे, ता. शिरूर, पुणे) तसेच कलावती अभिराज राठोड व आभिराज विकास राठोड (रा.शेंडगेवस्ती, न्हावरे, ता.शिरूर, पुणे) या दारू धंदेवाल्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

न्हावरे गाव आणि परिसराला अवैध गावठी दारूधंद्यांमुळे बकालपणा आला होता. प्रामुख्याने आलेगाव फाटा, न्हावरे गावाचा चौक आणि न्हावरे ग्रामपंचायत परिसर याठिकाणी सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस तळीराम सर्रास तर्राट झालेले आढळून येत होते. त्यामुळे न्हावरे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने दारू धंद्यांबरोबरच तळीरामांवर कारवाई करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून केली होती. याबाबत ‘दैनिक प्रभात’ ने अनेकदा आवाज उठवला होता. त्यानुसार न्हावरे पोलिसांनी अवैध दारू धंद्यांवर कारवाई केली आहे.

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रल्हाद जगताप, पोलीस हवालदार बाळासाहेब खोमणे, विकास कापरे व प्रवीण राऊत करत आहेत.