अहिराणी भाषा साहित्याची चळवळ…. – महासंवाद

अहिराणी भाषा साहित्याची चळवळ…. – महासंवाद
- Advertisement -

अहिराणी भाषा साहित्याची चळवळ…. – महासंवाद

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत आहे. मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी अनेक हात मदत करत आहे. शासनही याला पाठबळ देत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत हा भव्य सोहळा अनुभवणार आहेत. त्यानिमित्ताने आपल्या राज्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यांना उजाळा यानिमित्ताने देण्यात येणार आहे. खान्देशातील नावाजलेले साहित्यिक सुभाष आहिरे यांनी अहिराणी भाषा साहित्याची चळवळ यावर आपले व्यक्त केलेले मत….

एखाद्याच्या नेतृत्वाने सुरू झालेली चळवळ भविष्यात नामशेष होऊ शकते. परंतू समाज समुहाने मान्य केलेली चळवळ नामशेष होत नाही. कारण, अशा चळवळीत आपण समाजासाठी आहोत, ही समाज बांधिलकीची भावना रुजलेली असते. भाषा ही माध्यम असते, विचार हा स्वतंत्र असतो. जेव्हा एखादी विचारधारा समाजहिताची असते, तेव्हा ती विचारधारा समाज चळवळीचं रूप धारण करते. ह्याच सिद्धांतानुसार मी आणि माझा समाज, माझं गाव, माझी संस्कृती, माझी भाषा, माझं साहित्य या समाज बांधिलकीच्या विचारधारेतून खान्देशातील अहिराणी भाषा साहित्याची चळवळ गतिमान झाली आहे.

“भाषा साहित्याची चळवळ-अशी चळवळ असू शकते का? हो, शोधाचा भाग असू शकतो. परंतू काल परवा मान्य झालेला भाषा साहित्याचा जागर आज विकसित रूप धारण करुन यश संपादन करत आहे. म्हणजेच चळवळीत रुपांतर होत आहे. असं आमचं मत आहे कारण, काल अहिराणी भाषा ही निरक्षरांची भाषा आहे, म्हणून अहिराणी भाषेला आणि अहिराणी भाषा साहित्याला नाकारले जात होते. आज मात्र अहिराणी भाषा देखील साहित्याची भाषा आहे. अहिराणी भाषेच्या शब्दांनाही साहित्याचं सौदर्य आहे. ही बाब उमगल्यामुळे प्रसारमाध्यमांनी अहिराणी भाषा साहित्याला प्रसारणाच्या प्रवाहात आणलं आहे. वृत्तपत्रांच्या पुरवण्यांनी सुद्धा त्यांना स्थान दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने देखील माय भाषेची दखल घेऊन साहित्य संमेलने विकसित होणेकरीता मदतीचा हात पुढे केला आहे. खान्देशातील अनेक आमदारांनी आपला शपथविधी अहिराणी भाषेत केला आहे. शालेय पाठ्यपुस्तकांतही अहिराणी भाषा-साहित्याला प्रकाशित केले आहे. म्हणून भाषा साहित्यांची चळवळ गतिमान झाली आहे हे कबूल करणं भाग आहे.

भाषेची निर्मिती मानवाने केली आहे. ईश्वराने नाही, म्हणून भाषा हे मानवाचं आत्मनिवेदनाचं माध्यम आहे. ह्याच आत्मनिवेदनाचं कलात्मक रुप साहित्य आहे. आधीच्या आमच्या पित्यांनी गाव आणि गावची भाषा, गावची संस्कृती, रिती-भाती, गावचं साहित्य, पेहराव हे आज मौखिक साहित्याचं लिखित साहित्य करून ठेवले आहे. म्हणून आज वर्तमान काळातलं साहित्य आश्वासतांना भूतकाळातल्या मौखिक साहित्याचे बारकावे हाताळण्याविना अभ्यास पूर्ण होत नाही. म्हणून मौखिक आणि लिखित यांची नीटपणाने सांगड घातली की अहिराणी भाषा साहित्याचे पदर आपोआप उलगडतात. लोकांचे लोकभाषेचे लोकसाहित्य हे संवादाचे केंद्रस्थान आहे. ऐकणे, समजणे, लिहिणे, वाचणे, व्यक्त होणे ह्या क्रीयेतून अहिराणी भाषा साहित्य लोकांच्या काळजावर अधिराज्य गाजवते.

अहिराणी भाषा साहित्य हे लोकांच्या लोकप्रियतेने स्वीकारले असल्याकारणाने, ते आजही कालबाह्य झालं नाही. कारण अहिराणी भाषासाहित्यात लोकांच्या जगण्याचं जीवनमुल्य दडलेलं आहे. ह्या साहित्यात लोकांची लोकसंस्कृती अधोरेखित केलेली आहे. अहिराणी भाषा साहित्यात देखील नाविण्यता आहे. शब्दांचं सामर्थ्य आहे. शब्दांना ताल, सूर, लय आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे किंवा इंग्रजी भाषेच्या अतिरेकामुळे अहिराणी भाषासाहित्य नामशेष होईल अशी भीती बाळगण्याचे कारण नाही, कारण की, ब्रिटीशांचा राज्य कारभार इंग्रजी भाषेत होता. तरी सुद्धा अहिराणी भाषा आणि भाषा साहित्य ते नष्ट करु शकले नाहीत. जोपर्यंत गाव, गावची भाषा, गावची कुटूंब व्यवस्था सुरक्षित आहे, तोपर्यंत अहिराणी भाषासाहित्य नष्ठ होणार नाही.  कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्या मायभाषेचा स्वाभिमान असतो. जोपर्यंत माणसाचा स्वाभिमान जागृत आहे, तो पर्यंत भाषा आणि भाषेचं साहित्य सुरक्षित राहील. अहिराणी भाषासाहित्य हे अहिराणी आणि भाषिकांच्या भावनिक गरजेतून निर्माण झालेलं आहे, म्हणून ते सुरक्षित आहे.

अहिराणी भाषासाहित्य हे अहिराणी मौखिक परंपरेच सुधारित रूप आहे. अहिराणी भाषासाहित्य हे प्रयत्न करुन निर्माण झालेलं नाही. तर ते लोकांच्या लोकभावना एकजीव झाल्यावर निर्माण झाले आहे. म्हणून जसे लोकांचे लोकसाहित्य लोकभाषेचे नेतृत्व करते, तसे अहिराणी भाषिकांचे भाषासाहित्य हे अहिराणी भाषेचे नेतृत्व करते. अहिराणी भाषासाहित्याचा आत्मा खऱ्या अर्थाने अहिराणी लोकगीतात सापडतो. म्हणून अहिराणी भाषेच्या जात्यावरच्या ओव्या अहिराणी साहित्याचा गाभा कथन करतात. आज जात्यावरच्या ओवी गीतांची खोलवर समिक्षा झालेली नाही. ओवीचा मराठी भाषेत अर्थ सांगून उत्कृष्ट वाड्मयीन मुल्याच्या ओवींची बोळवण केलेली आहे. अहिराणी भाषेचे लोकगीत हे अहिराणी लोकभावनेचे संगीत आहे. नवरा मरुन गेल्यावर प्रेताजवळ रडणारी पत्नी आक्रोश कमी करते आणि काव्यगायन पद्धतीच्या सुरात जास्त रडते. आतून दाटून आलेला ऊमाळा जेव्हा अहिराणी भाषेच्या रचना गातो, तेव्हा पाषाण हृदयी माणूस देखील बर्फासारखा वितळू लागतो, हे अहिराणी रचनेचं खरं भाषासाहित्य आहे.

अहिराणी भाषेच्या लोकगीतांची तुलना वेद उच्चारणांशी करता येऊ शकते. कारण पाठांतर हे जसे वेदांच बळ आहे, तसं पाठांतर हे मौखिक अहिराणी रचनांचं बळ आहे. दोघांच्या गायनपद्धती समान आहेत. लोककल्याण हा दोघांचा हेतू समान आहे. परंपरेनुसार खान्देशात कोणतीही नवी वस्तू उपयोगात आणण्याच्या आधी त्या वस्तूवर अहिराणी भाषेच्या लोकगीताचा उच्चार करुन पुजा करून पवित्र केली जाते नंतर उपयोगात आणली जाते. ही खान्देशातील अहिराणी परंपरा आहे.

कोणतेही साहित्य लिखित होण्याआधी मौखिक असते. मौखिक साहित्याचे सुधारित रूप लिखित साहित्यात होते. कोणत्याही साहित्याला धर्मभेद, जातीभेद, भाषाभेद मान्य नसतो. अखंड मानव जातीचे कल्याण हा साहित्याचा हेतू असतो. ह्याच हेतूने बुद्ध, कबीर, संत तुकारामासह अनेक परिवर्तनवादी लेखकांनी साहित्य निर्माण केले आहे. वेदांची निर्मिती देखील अखंड मानवजातीच्या कल्याणाकरीता झालेली आहे. परंतू वेद रचनांना अध्यात्मिक दर्जा प्राप्त झालेला आहे. अहिराणी भाषासाहित्याच्या रचनांना अध्यात्मिक दर्जा प्राप्त झालेला नाही. तरी सुद्धा लोकांनी लोकश्रध्देच्या बळावर अहिराणी भाषेच्या रचनांना ‘लोकवेद’ असा दर्जा बहाल केलेला आहे.

अहिराणी भाषासाहित्याची चळवळ गतिमान होण्याचं मुख्य कारण असं आहे की, शालेय पाठ्यपुस्तकाच्या साहित्यात खान्देशाच्या मातीतला माणूस, खान्देशाच्या नाविन्यतेची संस्कृती, खान्देशाची अहिराणी भाषा छापलीच नाही. म्हणून खान्देशातील अहिराणी भाषिकांची भाषा विषयीची आत्मीयता जागृत झाली. म्हणून खान्देशातील साहित्यिकांनी आपल्या लेखनात गाव, गावची संस्कृती, गावच्या माणसांची व्यक्तीरेखा अधोरेखित केली. त्यामुळे अहिराणी साहित्याची मागणी वाढली. वाचकवर्गात वृद्धी झाली. अनेक काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटक, समिक्षा, ग्रंथ प्रकाशित झाले. अनेक प्राध्यापकांनी जशी लोकभाषेत पीएचडी पदवी धारण केली आहे, तशी खान्देशातील दहा प्राध्यापकांनी आहीराणी भाषासाहित्याची पीएचडी पदवी धारण केली आहे. तसेच चार प्राध्यापकांनी अहिराणी भाषा साहित्याचे संशोधन प्रकल्प यु.जी.सी. पुर्ण केले आहे. “देवनी करा कोप आनि राजानी ऊडनी जप” हे दोन अंकी अहिराणी भाषेचं नाटक अखिल भारतीय नाट्य महोत्सवात कणकवली येथे सादर झालं आहे. तसेच “औ तुनी माय” हा दोन तासाचा अहिराणी भाषेचा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला आहे. अहिराणी चित्रपटाच्या सीडी महाराष्ट्रात गाजल्या आहेत. तसेच जानकीनं लगीन हा बालविवाह प्रतिबंध आशयाचा चित्रपट अहीराणी भाषेत सीडी रुपात प्रकाशित आहे. डॉ. संजीव गिरासे, सुभाष आहीरे, वाल्मीक आहीरे, प्रविण माळी आदि आहीराणी भाषेचे कथाकथनकार म्हणून लोकप्रिय आहेत.

अहिराणी भाषा कळत नाही यावर माझा विश्वास नाही. गरजेतून माणूस भाषा शिकतो. परक्या देशाची इंग्रजी भाषा कळते. अहिराणी भाषा तर आपल्या मातीची भाषा आहे, ती का कळू नये? एकीकडे भाषा कळत नाही असं म्हणतात, दुसरीकडे जेव्हा डीजे वर “माय तुन्हा डोंगर हिरवागार, ढवळा बैल मन्हा नंदी व राजा, चमकया लुगडा नेसनी व बाय अशी गाणी वाजतात तेव्हा कंबर हलवून शिक्षित माणसंही नाचतात ही खरी भाषेची लोकप्रियता असते.

अहिराणी भाषा साहित्याचं संवर्धन ही कोण्या एका व्यक्तीची जबाबदारी नाही, तर ती शासनासहीत आपणा सर्वाची जबाबदारी आहे. ह्याच हेतूने अहिराणी साहित्य अकादमी, कन्नड, अहिराणी साहित्य कला संस्था, धुळे, अहिराणी साहित्य कला अकादमी, नंदुरबार, अहिराणी साहित्य परिषद, धुळे, खान्देश अहिराणी कस्तुरी मंच, पुणे, खान्देश वैभव सांस्कृतिक संस्था, पुणे, खान्देशी विकास संस्था, पुणे  अशा अनेक संस्था कार्यरत आहेत. साप्ताहिक शब्दशक्ती वर्धापनाच्या निमित्ताने मांडळ येथे 12 फेब्रुवारी, 1998 ला पहिले अहिराणी साहित्य संमेलन झाले. अहिराणी साहित्य समितीच्यावतीने कासारे येथे 27 फेब्रुवारी, 1999 ला अखिल भारतीय दुसरे अहिराणी साहित्य संमेलन झाले. कला गुणदर्शन मंडळाच्यावतीने चाळीसगांव येथे 24 मार्च, 2000 ला अखिल भारतीय तिसरे अहिराणी साहित्य संमेलन झाले. मराठा मंडळाच्यावतीने नाशिक येथे 3 डिसेंबर, 2011 रोजी चौथे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन झाले. खान्देश विकास प्रतिष्ठान, मुंबईच्यावतीने धुळे येथे पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन झाले. जिल्हास्तरावर अनेक अहिराणी साहित्य संमेलन झाली. खान्देश साहित्य संघ, धुळेच्या वतीने अहिराणी साहित्याची काव्य संमेलन गाजली. परकीय भाषा शिकून झाली. आता गावाची भाषा विकसित करायची आहे. ह्या भावनेने अहिराणी भाषासाहित्याची चळवळ वेगवान झाली आहे.

प्रत्येक अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी “लाकडाची गऊर” बीजदेवतेच्या रुपात पुजली जाते. आणि “दगडाचं जातं” ओव वाड्मय निर्मितींच साधन ह्या अर्थान पुजले जाते. अक्षय्यतृतीया ह्या सणाच्या दिवसाला लोक -वाङ्मय दिन” ह्या अर्थाने मानला जातो. अहिराणी भाषेला स्वतंत्र लिपी नाही. देवनागरी लिपीने लेखन होते. तसेच अहिराणी भाषेला त्या भाषेपुरतं व्याकरण आहे. अनुवाद विचारांना जोडण्याचं कार्य करतो. परंतू अहिराणी भाषा साहित्याचा अद्याप अनुवाद झालेला नाही. तरी अहिराणी भाषासाहित्याची निर्मिती थांबलेली नाही. अहिराणी भाषेच्या सांस्कृतिक कलेनं आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अशा अनेक कारणांनी अहिराणी भाषा साहित्याची चळवळ लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेली आहे.

अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी खान्देशातली गावं, शहरे आहिराणी लोकगीते समुहाने गातात. म्हणून अक्षय तृतीया हा सण अहिराणी भाषा दिन घोषित व्हावा आणि दगडाचं जातं हे पहिलं मानवकल्याण यंत्र आहे आणि अहिराणी ओवी गायनाचं साधन आहे.

सुभाष वामन अहीरे

सुप्रभात, 104, भगवत पार्क,

वरझडी रोड, शिरपुर, जि. धुळे

मो. 8806113713

- Advertisement -