हायलाइट्स:
- पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना उघड
- दोन दिवस महिलेचा मृतदेह घरातच होता पडून.
- चिमुकला भुकेनं व्याकूळ होतं आईच्या मृतदेहाशेजारीच थांबला.
शेजारील घरातून दुर्गंध येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांना महिलेच्या मृत्यूबाबत माहिती मिळाली. मात्र करोनाच्या भीतीमुळे कोणीही घराजवळ जाण्याचं धाडस केलं नाही. सुशीला गाभले आणि रेखा वाझे या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या घराकडे धाव घेतली.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी घराजवळ पोहोचल्यानंतर घराचं टाळं तोडलं आणि त्यांना धक्काच बसला. कारण घरामध्ये एक महिला मृत अवस्थेत आढळली आणि तिच्या शेजारी तिचं एक वर्षाचं मुल भूकेनं व्याकूळ झालं होतं. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या मुलाला दूध व बिस्किट खाऊ घातलं. तसंच त्या मुलाची प्रकृती ठीक नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिलासादायक बाब म्हणजे या मुलाची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मृत महिलेचं नाव सरस्वती राजेश कुमार असं आहे. ही महिला मूळची उत्तर प्रदेश येथील आहे. कामानिमित्त गेल्या काही महिन्यांपासून ती महिला आपल्या पती आणि मुलासह पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिचा पती एका कौटुंबिक कामानिमित्त उत्तर प्रदेशात गेला. त्यानंतर आता या महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिलेचा मृत्यू नक्की करोनामुळेच झाली की अन्य काही कारणे आहेत, याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.