उस्मानाबाद । १५ जुलै : बियाणे फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ग्रीनगोल्ड पाठोपाठ आणखी एका बियाणे कंपनीवर बोगस बियाणे प्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मध्यप्रदेश राज्यातील वरदान बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड असे त्या कंपनीचे नाव आहे.
तुळजापूर तालुक्याचे बियाणे निरीक्षक सतिश मारुती पिंपरकर यांनी तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाउन पिक पाहणी केली. यावेळी त्यांना बियाण्याची उगवण फक्त 17 ते 33 टक्के झाल्याचे आढळले. यानंतर मध्यप्रदेश राज्यातील उजैन, बसंत बिहार येथील वरदान बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या बियाणे उत्पादक कंपनीचे व्यवस्थापक भिमराव शिवाजी नागरगोजे यांच्या यांच्या विरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना दर्जाहीन सोयाबीन बियाणे पुरवठा करुन शेतकऱ्यांची व शासनाची फसवणुक केली आहे. अशी फिर्याद सतिश पिंपरकर यांनी दिली आहे.