…आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

…आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ
- Advertisement -

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रुग्णालयांतील ऑक्सिजन संपल्याने रुग्ण दगावल्याची उदाहरणे ताजी असतानाच कोथरूड परिसरातील एका रुग्णालयावर शनिवारी आलेले असेच एक संकट पोलिसांच्या दक्षतेमुळे टळले. या रुग्णालयात २० रुग्णांवर ऑक्सिजनच्या साह्याने उपचार सुरू असताना अवघा अर्धाच तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक होता. मात्र, पोलिसांच्या तातडीच्या हालचालींनी ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने मोठा अनर्थ टळला.

कोथरूडचे पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना कृष्णा हॉस्पिटलने सांगितले, की हॉस्पिटलचा ऑक्सिजन फक्त ३० ते ४५ मिनिटे शिल्लक आहे. ऑक्सिजन येणार होता, तो आलेला नाही. रुग्णालयात २० रुग्ण ऑक्सिजनवर असून, त्यांना दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न केला, तर खाटा उपलब्ध होत नाहीत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सूर्यप्रभा व सह्याद्री हॉस्पिटलकडून काही ऑक्सिजन सिलिंडर मिळवले; परंतु याने प्रश्न सुटणार नव्हता. पोलिस निरीक्षक डांगे यांनी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांनाही घटनेची माहिती दिली. त्यानंतर ऑक्सिजनचा शोध व्यापक प्रमाणात सुरू झाला आणि शिवाजीनगर परिसरात एक ड्युरा सिलेंडर असल्याची माहिती मिळाली. क्रेन, टेम्पोच्या साह्याने ड्युरा सिलिंडर तातडीने आणून ‘मिशन ऑक्सिजन’ पोलिसांनी पूर्ण केले.

राज्यात, देशात अनेक रुग्णालयांत ऑक्सिजन संपल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील करोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या रुग्णालयांकडून दररोज ऑक्सिजन; तसेच इतर तातडीच्या बाबींचा आढावा पोलिस घेत आहेत. त्यामुळेच कृष्णा हॉस्पिटलमधील प्रसंग पोलिसांच्या लक्षात आला.

जवळच्या रुग्णालयातून कृष्णा हॉस्पिटलला काही ऑक्सिजन सिलिंडर आणून दिले. मात्र, ते पुरेसे नव्हते. पोलिसांना अधिक शोध घेण्यासाठी काही अवधी मिळाला. शिवाजीनगर परिसरात ‘ड्युरा सिलिंडर’ असल्याचे समजल्याने पोलिसांनी तेथून सिलिंडर ‘एस्कॉर्ट’ केला. यासाठी मेट्रोच्या क्रेनची मदत घेण्यात आली.

– मेघश्याम डांगे,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड

नातेवाइकांची गडबळ अन् पोलिसांचा धीर

हॉस्पिटलमधील ऑक्सिजन सिलिंडर संपत आल्याचे नातेवाइकांना कळल्यामुळे नातेवाइकांनी रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केले; तसेच रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली. ऑक्सिजनची गाडी न आल्यामुळे प्रश्न निर्माण झाल्याचे सांगूनही नातेवाइकांचा गोंधळ थांबेना. मग पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून बंदोबस्त ठेवला होता. काही काळ तरी सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता.

Source link

- Advertisement -