Home शहरे मुंबई …आणि मनसे शाखेत लागले ‘शुभमंगल’

…आणि मनसे शाखेत लागले ‘शुभमंगल’

0
…आणि मनसे शाखेत लागले ‘शुभमंगल’

[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी

भांडुप : ‘खळ्ळ खट्याक’ करणारा पक्ष अशी ओळख असलेल्या मनसेच्या भांडुप पश्चिम येथील राजगड शाखा क्रमांक ११२मध्ये चक्क ‘शुभ मंगल सावधान’चा गजर झाला. शाखाप्रमुख सुनिल नारकर यांच्या ‘मनसे‘ पुढाकाराने ते शक्य झाले आणि वधू-वरांचे कुटुंबिय आनंदित झाले. त्या दिवशी जर हा विवाह झाला नसता, तर वधू-वराला दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागली असती.

भांडुप येथील रहिवासी असलेले भोसले आणि परब कुटुंबातील प्रसाद आणि अस्मिता या दोघांचा विवाह २८ एप्रिल रोजी भांडुप येथील सह्याद्री शाळेच्या सभागृहात नियोजित करण्यात आला होता. पत्रिकांचे वाटपही झाले होते. मात्र राज्यात लॉकडाउन जाहीर झाला. दोन तासांत विवाह सोहळा पूर्ण करण्याचे आदेश लागू झाले. २७ तारखेला वधू-वराकडील मंडळी सभागृहात सामान घेऊन गेले. मात्र सभागृह व्यवस्थापकांनी, ‘नियमांचे पालन झाले नाही तर आम्हाला दंड भरावा लागेल’ असे सांगत विवाह सोहळा करण्यास नकार दिला. गतवर्षी २९ एप्रिल रोजी प्रसाद यांच्या वडिलांचा करोना काळात मृत्यू झाला होता. जर हे लग्न त्याआधी झाले नसते, तर परंपरेनुसार दोन वर्षे लग्न होणार नाही ही बाब ज्येष्ठांनी लक्षात आणून दिल्यानंतर कुटुंबिय चिंतेत पडले.

धर्मसंकटात सापडलेल्या या कुटुंबियांना स्थानिकांनी मनसे शाखाप्रमुख नारकर यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कटुंबिय नारकर यांच्या कार्यालयात पोहचले. त्यांनी आपली व्यथा मांडल्यावर क्षणाचाही विलंब न लावता, ‘उद्या आमच्या कार्यालयात तुमचा विवाह सोहळा पार पडेल’ असे नारकर यांनी सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी ठरलेल्या मुहुर्तावर करोनाविषयीचे सर्व नियम पाळून २५ जणांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. एरवी ‘खळ्ळ खट्याक’ अशी ओळख असलेल्या या मनसे शाखाप्रमुखांनी पक्षाचा प्रेमळ चेहराही नागरिकांना दाखवला, अशी भावना व्यक्त करत कुटुंबियांनी नारकर यांचे आभार मानले. अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे पक्षाने उभे राहावे या पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार आम्ही हे केल्याचे नारकर यांनी सांगितले.

[ad_2]

Source link