हायलाइट्स:
- निखिल जैनबरोबरचे लग्न अमान्य केल्यानंतर अभिनेत्री नुसरत जहांवर झाली टीका
- नुसरत-निखिलच्या खासगी आय़ुष्यावर होत आहे सार्वजनिक चर्चा
- नुसरतने टीकाकारांना दिले उत्तर सडेतोड उत्तर
निखिल आणि नुसरत यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना नुसरत प्रेग्नंट असल्याची बातमी आली. इतकेच नाही तर नुसरतचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरूनही पुन्हा एकदा नुसरत चर्चेत आली असून तिला वाईट पद्धतीने ट्रोल केले जात आहे. इतकेच दिवस नुसरतने यासर्वांवर मौन बाळगले होते. परंतु नुसरतने तिच्या इ्न्स्टाग्रामवरून ट्रोल करणा-यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. नुसरतने तिच्या इन्टाग्राम स्टोरीवर दोन स्टोरी शेअर केल्या आहेत. त्या स्टोरीमधील जो आशय आहे, त्यावरून नुसरतने तिच्यावर टीका करणा-यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे.
काय आहेत स्टोरी

नुसरतने शेअर केलेल्या पहिल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे, ‘आपल्या प्रत्येकाला अशा एका व्यक्तीची गरज असते की जी व्यक्ती तुमच्याबद्दल पूर्वग्रह मनात न ठेवता तुमची गोष्ट धैर्याने ऐकून घेते…’ नुसरतच्या आयुष्यात सुरू असलेल्या घडामोडींकडे ही पोस्ट सूतोवाच करते. गेल्या काही दिवसांपासून नुसरतच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जे काही सुरू आहे, त्यावरून तिला ट्रोल केले जात आहे. निखिलसोबत केलेले लग्न नुसरतने अमान्य केल्यामुळे तिच्यावर टीका होत आहे.
नुसरतने शेअर केलेल्या दुस-या पोस्टमध्ये असे नमूद केले आहे, ‘ प्रत्येकाला सक्षम महिला आवडतात. त्या सक्षम महिलेला लोक काहीही बोलतात.परंतु ती सक्षम महिला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, हे तिचे वैशिष्ट्य असते. ही महिला लोकांचे म्हणणे कधीच ऐकत नव्हती आणि यापुढेही ऐकणार नाही…’

नुसरतची ही दुसरी पोस्टमधून तिच्यावर टीका करणा-यांना तिने अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. नुसरतने आपल्या वैवाहिक आयुष्यातील सत्य जेव्हा लोकांसमोर आणले. त्यानंतर लोक तिच्याविरोधात बोलू लागले. तिच्यावर टीका होऊ लागली. इतकेच दिवस नुसरतने यावर मौन बाळगले होते, परंतु आता या दोन पोस्ट शेअर करत तिने टीकाकारांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

अभिनेत्री नुसरत जहां आणि उद्योगपती निखिल जैन यांनी २०१९ मध्ये टर्कीमध्ये जाऊन मोठ्या दिमाखदार पद्धतीने लग्न केले. या दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले. परंतु अवघ्या दोन वर्षांतच त्यांचे हे नाते संपुष्टात आले. या दोघांमध्ये तणाव निर्माण झाल्याने ते नोव्हेंबर २००० पासून वेगळे राहू लागले. दरम्यान, नुसरत प्रेग्नंट असल्याची बातमी आली. परंतु तिच्या प्रेग्नंसीबाबत आपल्याला काहीच माहिती नाही असे निखिलने जाहीर केले. निखिल आणि नुसरत यांना लग्नबंधनातून मुक्त व्हायचे आहे. मात्र नुसरतच्या मते या दोघांचे लग्न भारतीय कायद्यानुसार झालेले नाही , तसेच त्याची नोंदणीही झालेली नाही. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचा दावा नुसरतने केला आहे. यासंदर्भात नुसरतने एक निवेदन देखील प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये तिने निखिलवर तिचे दागिने हडप केल्याचा आरोप केला आहे. नुसरतने केलेल्या या सर्व आरोपांवर निखिलने देखील उत्तर दिले आहे. त्याने सांगितले की, लग्नानंतर त्याची नोंदणी करू या म्हणून अनेकवेळा नुसरतला सांगितले होते, परंतु तिने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. इतकेच नाही तर लग्नानंतर काही दिवसांनी तिचे वागणे अमूलाग्र बदलले, असा दावाही निखिलने केला होता.

दरम्यान, नुसरत आणि अभिनेता यश दासगुप्ता यांच्यात अफेअर असल्याची चर्चा आहे. अर्थात यावर नुसरतने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नुसरत आणि यशने अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. या दोघांची ऑनस्क्रिन जोडी खूपच लोकप्रिय झाली आहे.