Home ताज्या बातम्या आता चक्‍क कांदा उत्पादकांच्या डोळ्यातच पाणी

आता चक्‍क कांदा उत्पादकांच्या डोळ्यातच पाणी

नांदुर : काही महिन्यांपूर्वी विक्रमी किमतीने भाव खाऊन जाणाऱ्या कांद्याने आता चक्‍क कांदा उत्पादकांच्या डोळ्यातच पाणी आणले आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसह विविध कारणांमुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. शेतकऱ्यांना चार ते पाच रुपये या मातीमोल भावात कांद्याची विक्री करावी लागत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. कांद्याचे अर्थचक्र अधांतरी झाले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

दौंड तालुक्‍यात विविध भागात शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामामध्ये कांद्याची लागवड केली. शेतकऱ्यांनी मेहनत करत घाम गाळून कांद्याचे उत्पादनही चांगले घेतले. कांद्याचे पीक काढण्यासाठी तयार झाले असतांनाच करोनाचे विश्‍वव्यापी संकट कोसळले. करोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून टाळेबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली. यातून शेती कामे वगळली असली तरी त्याचा विपरित परिणाम पडला.

कांदा काढण्यासाठी वेळेत मजूर मिळाले नाहीत. जे मजूर कामावर आले, त्यांनी दुप्पट-तिप्पट मजुरी घेतली. अथक परिश्रमाने कांदा घरात आला. त्यानंतर तो विक्रीला काढला असता व्यापारी खरेदी करण्यास फारसे उत्सुक नव्हते. काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात कांद्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात कांदा पडून आहे.

टाळेबंदीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी ग्राहकांकडे घरपोच कांदा विक्रीचा प्रयोग केला. मात्र, तोही फारसा यशस्वी ठरला नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्याची क्षमता नाही. काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना अत्यल्प भावात कांदा देण्याऐवजी स्वत: रस्त्यावर ट्रॅक्‍टर लाऊन कांदे विक्री केला. 40-50 किलोच्या कट्ट्यांमधून थेट ग्राहकांना दिले.

मात्र, ग्राहकही पडलेल्या भावाने मागणी करीत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचाही कांद्याला जबर फटका बसला आहे. पाणी लागलेला कांदा जास्त दिवस टिकत नाही. सध्या व्यापारी चांगल्या दर्जाचा कांदा चार ते पाच रुपये किलो दराने मागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत. आधीच नैसर्गिक आपत्तीने शेतकरी खचलेला आहे.

पाणीपुरीच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वच खाद्य व्यवसायाच्या ठिकाणी कांद्याचा उपयोग होतो. सर्वच कालावधीत कांद्याला चांगली मागणी असते. करोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली. या काळात हॉटेलसह सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. परिणामी, कांद्याची मागणी रोडावली आहे.

शासनाने मदत करावी
खरीपातील विविध पिकांची नुकसान भरपाई निघण्यासाठी शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. पुन्हा नैसर्गिक आपत्ती आल्याने दोन-तीन वेळा कांद्याचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीतही काढलेला कांद्याची टाळेबंदीच्या काळात विक्री करावी कशी? असा प्रश्‍न उभा ठाकला आहे. कांदा सडण्याचे प्रमाण वाढून तो फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, शासनाकडून मदतीची मागणी होत आहे.

सध्या सर्वत्रच करोनामुळे उत्पादन जास्त व मागणी कमी झाली आहे. यामुळे कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. कांदा पिकाला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. टाळेबंदीमुळे कांद्याला मागणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.