आता राज्यातील सगळ्याच धरणांवर खेकड्यांची तपासणी होणार

- Advertisement -

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे २० पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर हे खेकड्यांमुळे फुटले असा दावा जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी केल्यांनतर त्यांच्यावर चहुबाजूने टीका झाली होती. विरोधकांनी सावंत यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत त्यांच्या निवासस्थानी खेकडे सोडले होते.

राज्याच्या जलसंपदा विभागाने अधीक्षक अभियंत्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील धरणांना खेकड्यांपासून धोका आहे का, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मातीच्या धरणांनाच खेकड्यांपासून धोका असतो, अशी चर्चा आहे. मात्र एका संशोधनात सर्वच प्रकारच्या धरणांना खेकड्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हटले आहे. खेकडे मातीत बीळ करू शकतात, त्याच ताकदीने मुरुमही पोखरू शकतात अशी माहिती आहे.

दरम्यान, जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील विविध ठिकाणच्या धरणांची चौकशी होणार आहे. तसेच ज्या धरणांना धोका आहे त्या धरणांची डागडुजीही करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या संकटांपासून नागरिकांची सुरक्षा होणार आहे.

- Advertisement -