आदिवासी मुलींना शिक्षण मिळणे ही काळाची गरज – राज्यमंत्री इंद्रनील नाईक – महासंवाद

आदिवासी मुलींना शिक्षण मिळणे ही काळाची गरज – राज्यमंत्री इंद्रनील नाईक – महासंवाद
- Advertisement -

यवतमाळ, दि. ०९ (जिमाका): आदिवासी समाजातील मुले शिक्षण घेऊन उच्चपदावर नियुक्त होत आहे. ही अतिशय अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे. या समाजातील प्रत्येक गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुलींना देखील चांगले शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसदच्यावतीने आयोजित आदिवासी बचत गट व वैयत्तिक वनहक्कधारक लाभार्थ्यांचा मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री नाईक बोलत होते. यावेळी प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, तहसिलदार महादेव जोरवर, गटविकास अधिकारी संजय राठोड, अॅड. सुनिल ढाले तसेच उपवनसंरक्षक, माविम व्यवस्थापक, शबरी व वित्त महामंडळ, उमेद, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुसद प्रकल्पामध्ये विविध विकास योजना व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची कामे यशस्वीरित्या पार पाडत असल्याबाबत राज्यमंत्री नाईक यांनी समाधान व्यक्त केले. येत्या पाच वर्षांमध्ये कार्यालय, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांचे इमारत बांधकाम पूर्णत्वास जाईल, याची ग्वाही दिली. पुसद शहरात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील मुली शिक्षण घेऊन उच्चपदावर नियुक्त होत असल्याबाबत त्यांनी आभिमान व आनंद व्यक्त केला.

मेतकर यांनी प्रास्ताविकात 100 दिवस कृती कार्यक्रम तसेच प्रकल्प कार्यालयांतर्गत राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक व विकास विषयक विविध योजना, सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, वनपट्टेधारकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, न्यूक्लीअस बजेट, शबरी आदिवासी घरकुल, स्वाभिमान सबलीकरण योजना, पारधी विकास योजना, ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान योजना, धरतीआबा जनजाती उन्नतग्राम अभियान योजनांची माहिती दिली.

आर्णी तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील पारधी माता महिला बचत गटाच्या सचिव चंद्रभागा राठोड यांनी पारधी पॅकेज योजनेंतर्गत जलशुद्धीकरण यंत्र व्यावसायीकदृष्ट्या लाभदायक ठरत असल्याबाबत मनोगतात सांगितले. यावेळी शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेद्वारे विविध पदावर नियुक्त झालेल्या आदिवासी मुलींना गौरविण्यात आले. वनपट्टेधारक व न्यूक्लीअस बजेट योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले. मान्यवरांच्याहस्ते माहिती पत्रकाचे प्रकाशन तसेच महिला बचत गटांच्या स्टॉल्सचे उद्घाटन करण्यात आले.

नारायण राऊत व समाधान जाधव यांनी सूत्रसंचलन केले. आभार अरुण चव्हाण यांनी मानले.

०००

- Advertisement -