Home बातम्या ऐतिहासिक आदिवासी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

आदिवासी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

0
आदिवासी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

नागपूर, दि. १९ : आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व घटकांनी प्रभावीपणे काम करणे आवश्यक आहे. अद्यापही अनेक योजना आदिवासींपर्यंत पोहोचल्या नाहीत. दुर्गम भागातील आदिवासी गावे-तांडे, पाड्यापर्यंत शासकीय वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृती करावी, असे आदेश राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.

नागपूर येथील अपर आदिवासी आयुक्त कार्यालयात श्री. तनपुरे यांनी बैठक घेतली. तुमसर विधानसभा मतदारसंघातील नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आदी विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाचा राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांच्यासह  उपायुक्त दशरथ कुळमेथे, सहायक आयुक्त नयन कांबळे, सहायक आयुक्त (वित्त) विलास कावळे, सहायक आयुक्त (शिक्षण) एम. एस. जोशी, नागपूरचे प्रकल्प अधिकारी अशोक वाहणे, अधीक्षक अभियंता उज्ज्वल डाबे आदी उपस्थित होते.

भंडारा  जिल्ह्यातील  तुमसर मतदारसंघातील वैयक्तिक आणि  सामूहिक लाभाच्या योजनांचा आढावा घेत ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा. शेतकऱ्यांना वैयक्तिक आणि सामूहिकपणे सौर पॅनल घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. या योजनेमुळे त्यांना दिवसा शेतीसिंचन करता येईल. पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सौरकुंपण योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.

आदिवासी विकास विभागाच्या विविध वैयक्तिक योजनांचा आढावा घेताना श्री. तनपुरे यांनी ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी अपघात विमा योजना, अनु. जमातीच्या कुटुंबासाठी घरगुती गॅस संचचा पुरवठा योजनांचाही त्यांनी आढावा घेतला. सोबतच प्रशिक्षण योजनांही प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या. त्यामध्ये वाहन प्रशिक्षण, कंडक्टर प्रशिक्षण, सुरक्षागार्डचे प्रशिक्षण, प्लम्बरचे प्रशिक्षण, इलेक्ट्रोनिक, जैविक तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एमएससीआयटी प्रशिक्षण, पीएमटी प्रशिक्षणासोबतच संगणक टॅली प्रशिक्षण आदी योजनांवर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मानव संसाधन व संपत्तीच्या योजनांमध्ये हैण्डबॅगचे वाटप, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, दुचाकी सायकल, अपंगांना तिनचाकी सायकल, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमातीच्या लोकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्जरूपात बीजभांडवल देण्यात येते. तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी आर्थिक मदत कर्जरूपात दिली जाते. या बीजभांडवल योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या  वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी उपायुक्त श्री. कुळमेथे यांनी गौंडी पेंटिंग देऊन त्यांचे स्वागत केले.