
वीर शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सव व आदिवासी मेळावा
नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण, उपस्थितांची दाद
चंद्रपूर, दि. 12 मार्च : आदिवासी विकास विभाग हा गरिबांचे कल्याण करणारा विभाग आहे. शेवटच्या व्यक्तीला विकासाचे केंद्रबिंदू म्हणून आपला विभाग कार्यरत आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात 40 टक्के निधी वाढवून मिळाला असून यावर्षी 21 हजार 495 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी योग्य बाबींवर खर्च केला जाईल. कोणतेही चुकीचे काम माझ्या हातून होणार नाही, असे आश्वस्त करत आदिवासी समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
एकात्मिक आदिवासी विकास विभाग, चंद्रपूरच्या वतीने क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सव व आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सहआयुक्त विनोद पाटील, आदिवासी विकास विभाग नागपूरचे उपायुक्त दिगंबर चव्हाण, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, प्रवीण लाटकर (चिमूर), पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, गोंड राजे महाराज आत्राम, शशिकला उईके, विलास मसराम, सुदर्शन निमकर, कारागृह अधीक्षक श्री. कुंबरे आदी उपस्थित होते.
राज्यात पेसा अंतर्गत 13 जिल्हे व 59 तालुके आहेत. या सर्व ठिकाणी राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आपण प्रवास केला आहे, असे सांगून मंत्री डॉ. उईके म्हणाले, आदिवासी समाजाच्या विकासासाठी विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगले नियोजन करण्यात येईल. आदिवासी आश्रम शाळांची अवस्था पाहण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज साधण्यासाठी ‘संवाद चिमुकल्यांशी’ या उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी, अधिका-यांनी आश्रमशाळेत मुक्काम केला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून सर्व आश्रमशाळेत अद्ययावत वसतीगृह बांधण्यात येईल.
त्यामुळे आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पालकांनीसुद्धा आगामी सत्रात आपल्या पाल्यांना आश्रमशाळेत प्रवेश द्यावा. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी 100 टक्के शिक्षकांची पदे भरण्यात येईल. तसेच समाजातील महापुरुष, क्रांतीकारक यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आदिवासी सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय बांधण्यात येईल.
आदिवासी समाजामध्ये परिवर्तन घडविण्याची ताकद
आदिवासी समाजासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी बाबुराव शेडमाके यांनी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर आहे. महापुरुषांनी केलेले काम, त्यांनी केलेली क्रांती सर्वसामान्य लोकांपर्यंत व आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. म्हणूनच शासन स्तरावर शहीद बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. या समाजाच्या प्रगतीसाठी आपण अहोरात्र काम करू. आदिवासी समाजाची संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम शहीद बाबुराव शेडमाके यांनी केले. या संस्कृतीला तडा जाऊ देऊ नका. आपला समाज हा परिवर्तन घडू शकतो. संस्कृती टिकली तरच समाजसुद्धा टिकेल. अतिशय प्रामाणिक आणि नम्र असलेल्या या समाजाने एकसंघ राहणे गरजेचे आहे. परिवर्तन घडवण्याची ताकद या समाजामध्ये आहे, असेही आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले.
आदिवासींच्या जमीन पट्ट्यांचा विषय मार्गी लागावा : हंसराज अहीर
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले, शहीद बाबुराव शेडमाके यांच्या जयंती उत्सवाचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहे. हे स्थान देशभक्तीने प्रेरित असून येथील पिंपळाच्या झाडाखाली बाबुराव शेडमाके यांना फाशी दिली गेली. देशात अनेक आदिवासी क्रांतिकारी निर्माण झाले. आदिवासींनी ब्रिटिशांना त्यांची जागा दाखवली. शहीद शेडमाके यांच्या कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी. आदिवासींच्या पूर्वजांनी देशाची सेवा केली आहे, त्याचे स्मरण व्हावे. तसेच आदिवासींच्या जमिनीच्या पट्ट्यांचा विषय मार्गी लागवा, अशी मागणी त्यांनी केली.
ही भूमी सर्वांसाठी प्रेरणादायी : आमदार किशोर जोरगेवार
क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचा जयंती उत्सव हा परिवर्तनाचा कार्यक्रम आहे. बाबुराव शेडमाके यांच्या जयंती सोबतच आदिवासी मेळावा या पुण्यभूमीवर होत आहे, हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आदिवासींची कर्मभूमी असलेली ही भूमी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या भूमीवर आदिवासींनी अनेक वर्ष राज्य केले. त्यामुळे आदिवासी संस्कृतीचे केंद्र या भूमीवर तयार व्हावे, राज्याच्या आदिवासी विकास विभागाने चंद्रपूरला भरभरून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली
आदिवासी आश्रम शाळा बोर्डाच्या वतीने उत्कृष्ट ढोल पथक तसेच जय सेवा गोंडी नृत्य मंडळ, लोहारा यांच्यातर्फे आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी इतरही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण केले व उपस्थितांची मने जिंकली.
तत्पुर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिकारी शहीद बाबुराव शेडमाके वीर स्मारकाला मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच दीप प्रज्वलन व बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदिवासी मेळावा निमित्त येथे आयोजित सिकलसेल व दंतचिकित्सा शिबिराचे उद्घाटन आणि पाहणी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते माहितीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकात्मिक आदिवासी विकास विभाग चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी तर संचालन सपना पिंपळकर यांनी केले..