
मुंबई, दि.१६ : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सरकारी चॅनेल्स (टीव्ही, रेडिओ, खात्रीशीर सोशल मीडिया, स्थानिक प्रशासन) यांच्याकडूनच माहिती घेऊन सतर्क रहावे. परिस्थिती अशांत होईल अशा अफवा किंवा अनधिकृत माहिती पसरवू नये. आपत्कालीन परिस्थितीत टॉर्च, बॅटऱ्या, मेणबत्त्या, प्राथमिक उपचार किट व आवश्यक औषधे, पाणी (किमान ३ दिवस पुरेसे) व टिकाऊ अन्न, मोबाईल चार्जर आणि पॉवर बँक, वैध ओळखपत्रे व आवश्यक रोख रक्कम, महत्त्वाच्या संपर्क क्रमांकांची यादी आदी आवश्यक वस्तू तयार ठेवाव्या.
मूलभूत सुरक्षा नियम
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जवळचे आश्रयस्थान, बंकर किंवा इव्हॅकेशन प्लेसेस, घरातील सुरक्षित जागा (खिडक्यांशिवाय असलेली खोली) तसेच “लाइट्स आउट” किंवा “ब्लॅकआउट” सूचनांचे पालन करावे. हवाई हल्ला किंवा क्षेपणास्त्र अलर्ट आल्यास ताबडतोब घरात रहावे; सुरक्षित, ठिकाणी आश्रय घ्यावा. खाली बसून डोकं झाकावे, खिडक्यांपासून दूर रहावे, दिवे बंद व खिडक्यांवर जाड पडदे ठेवावे, सायरन काळात लिफ्टचा वापर टाळून जिन्यांचा वापर करावा.
तसेच दिव्यांग व लहान मुले व वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. नागरी संरक्षण स्वयंसेवक, स्थानिक पोलीस किंवा सुरक्षा कर्मचा-यांनी दिलेल्या सूचना पाळाव्या. अनावश्यक प्रवास टाळावा. वाहतूक नियमांचे पालन करावे. सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लागू असल्यास पर्यायी मार्गाबाबत माहिती घ्यावी.
संवेदनशील माहिती (सैन्य हालचाली, महत्त्वाचे ठिकाणे) कुणाशी शेअर करू नका. संशयास्पद लिंक किंवा मेसेजवर क्लिक करू नका किंवा पुढे पाठवू नका. आपत्कालीन परिस्थितीत नेटवर्क फ्रि ठेवण्यासाठी संवाद मर्यादित ठेवावा. घाबरल्याने गोंधळ निर्माण होतो- शांत राहा व इतरांनाही माहिती द्या व मदत करावी. कर्फ्यू, हालचाल निर्बंध व आपत्कालीन आदेश पाळून स्थानिक प्रशासनाला मदत करावी. आपली जागरूकता, शिस्त व एकात्मता राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सज्ज असावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक
आपत्ती व्यवस्थापन विभाग मदत कक्ष : १०७०/१९१६/९३२१५८७१४३, मुंबई पोलिस – १०० / ११२, मुंबई अग्निशमन केंद्र – १०१, २३०८५९९२, रुग्णवाहीका – १०८, महिला मदत कक्ष – १०३, अल्पवयीन मुलांकरिता मदत कक्ष – १०९८, वन विभाग – १९२६, गॅस गळती मदत कक्ष (LPG) – १९०६, बेस्ट पॉवर (शहर) ८८२८८३०२८८, ९९३०९०११९३, अदाणी एनर्जी (पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरांचा काही भाग) ५०५४९१११, ५०५४७२२५, महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी बोर्ड (पूर्व उपनगरे) १८००-२३३-२३४५, ९९३०२६९३९८, टाटा पॉवर (चेंबूर) – ६७१७५३६९, रेल्वे संरक्षण दल (RPF): १८२ (ट्रेन-संबंधित आपत्कालीन परिस्थितींसाठी).
00000
नीलेश तायडे/विसंअ/