आपत्ती निवारण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे सूक्ष्म व्यवस्थापन

आपत्ती निवारण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे सूक्ष्म व्यवस्थापन
- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलेल्या नियोजनामुळे मागील वर्षी जुलैमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीत जीवितहानी टाळणे शक्य झाले. यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाली तर जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे.

नियोजनबध्द प्रयत्न – संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेवून संबंधित सर्व प्रशासकीय विभागांना सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर धरणात उपलब्ध पाणीसाठा, दैनंदिन पर्जन्यमान, पूरबाधित नागरिक व जनावरांच्या स्थलांतरासाठीचे नियोजन, बचाव व मदत कार्य याबाबत चोख नियोजन केले आहे. याबरोबरच त्या-त्या प्रशासकीय विभागाने पूर परिस्थितीत पार पाडावयाच्या जबाबदारीबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे, जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीला योग्य पध्दतीने सामोरे जाता येईल.

पूर व्यवस्थापनाचे गावनिहाय नियोजन- आपापल्या स्तरावर जिल्हा, तालुका आणि गाव अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने पूर व्यवस्थापनासाठी नियोजन पूर्ण केले आहे.

मदत व बचावकार्य – जिल्ह्यात अतिवृष्टी होवून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पूरबाधित नागरिकांना मदत देणे, तात्काळ बचावकार्य सुरु करणे, नागरिक व जनावरांचे स्थलांतर, त्यांच्या निवाऱ्याची, जेवणाची व्यवस्था, जनावरांसाठी चारा, छावण्या, वैद्यकीय सुविधा व औषधोपचार, निवारागृहांमध्ये राहणाऱ्या पूरबाधितांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे आदींबाबत नियोजन करण्यात आले आहे.

24 तास आपत्कालीन नियंत्रण – जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर 24 तास ‘आपत्कालीन नियंत्रण कक्ष’ सज्ज ठेवण्यात आले आहेत. या सर्व आपत्कालीन कक्षामध्ये 24 तास तीन सत्रामध्ये कर्मचारी कार्यरत आहेत.

साधनसामग्री – रबर बोट 57, लाईफ जॅकेट 900, लाईफ रींग 306, हेवी ड्युटी सर्च लाईट 30, साँ कटर (चेन साँ) 36, हायड्रॉलिक कटर 6, ब्रिथिंग अपेरेंटस (for smoke area) 6, ब्रिथिंग अपेरेंटस (under Water) 12 व इमरजन्सी फोलोटींग लाईट (generator mounted) 6 इतकी साधनसामुग्री उपलब्ध आहे.

331 गावात 615 ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम- अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन अशी आपत्कालीन परिस्थिती तसेच आणीबाणी प्रसंगी नारिकांना सजग करणे व जनजागृतीसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर शहरासह 331 गावात जिल्ह्यातील 615 ठिकाणी सार्वजनिक सूचना यंत्रणा बसविण्यात आली आहे. याव्दारे नव्याने विकसित केलेल्या संगणक प्रणालीव्दारे पूरबाधित गावातील लोकांना अलर्ट दिला जात आहे. ही यंत्रणा येत्या काही दिवसात आणखी 600 ठिकाणी बसविण्यात येणार आहे. ‘सार्वजनिक सूचना यंत्रणे’व्दारे नागरिकांना जलद माहिती पोहचविण्यात येत आहे.

स्वयंसेवकांचे जाळे -जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार स्वयंसेवकांचे जाळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयार ठेवण्यात आले आहे. पोलीस सेवा संघटनेबरोबरच इतर 7 स्वयंसेवी संस्थेचे एकूण 2 हजार 70 स्वयंसेवक कार्यरत आहेत.

आपदा मित्रांना बचाव कार्याचे प्रशिक्षण- जिल्ह्यात कार्यरत आपदामित्रांना मदत आणि बचावकार्याचे दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले आहे. जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध साहित्य आणि साधनांची चाचणी घेण्यात आली आहे. तसेच त्याच्या वापराबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष : 1077 टोल फ्री क्रमांक- आपत्कालीन परिस्थितीची तत्काळ माहिती मिळण्याकरीता 1077 हा टोल फ्री क्रमांक आहे. याखेरीज 0231-2659232, 2652950, 2652953 अथवा 2652954 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात 100 जणांचे पथक- जिल्हाधिकारी कार्यालयात बचाव आणि मदत कार्यासाठी 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 24 तास 100 स्वयंसेवकांची रेस्क्यू टीम (बचाव पथक) कार्यरत आहे. यासह संपूर्ण जिल्ह्यात बचाव आणि मदत कार्यासाठी 1070 स्वयंसेवक आपदामित्र म्हणून कार्यरत राहणार आहेत.

पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित- जलसंपदा विभागामार्फत 24 तास पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. याद्वारे धरण क्षेत्रातील पाऊस, धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुका व ग्रामस्तरापर्यंत त्वरित पोहोचवण्यात येते. तसेच ही माहिती www.rtsfros.com या संकेतस्थळावर दिली जात आहे.

पशुसंवर्धन विभाग दक्ष – संभाव्य पूर परिस्थितीबाबत पशुसंवर्धन विभाग दक्ष आहे. तरीदेखील पशुपालकांनी आपल्या जनावरांचे योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच पशुपालकांनी चारा व पशुखाद्याची योग्य ठिकाणी साठवणूक करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत स्थलांतरित, छावणीतील जनावरांकरिता ग्राम स्तरावर चारा वाटप समितीचे गठण केले आहे. याबरोबरच अतिरिक्त मनुष्यबळाबाबत नियोजन असून महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीस अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. यावर्षी संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी पूर बाधित होऊ शकणाऱ्या कुक्कुट शेड धारकांना आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कार्यरत विविध सेवाभावी संस्था, गोशाळा, पांजरपोळ, सहकारी दूध संस्थाना चारा छावणी उभारणी संदर्भात संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधत आहेत.

निवारागृहाचे नियोजन- पूरबाधीत लोकसंख्येबाबत निवारागृहाची तालुकास्तरावर यादी तयार करण्यात आली आहे. या निवारागृहामध्ये खालील सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. निवारागृह निर्जंतुक करणे, वीज, पाणी, स्वच्छतागृहे इत्यादी पायाभूत सुविधा देणे, निवारागृहात नेमण्यात येणा-या अधिकारी/कर्मचारी यांचे नेमणूक आदेश आगाऊ तयार करुन ठेवणे. स्वयंसेवी संस्था, रेस्क्यू फोर्स यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या सेवांचे नियोजन करण्यात येत आहे.

साथरोगाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन – साथरोग नियंत्रणासाठी 5 सामान्य/उपजिल्हा रुग्णालये, 18 ग्रामीण रुग्णालये, 76 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 416 उपकेंद्रामार्फत 1 हजार 25 ग्रापंचायती व 1 हजार 225 गावातील लोकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तात्काळ आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 36 रुग्णवाहिका (108 क्रमांक) आरोग्य विभागाने सज्ज ठेवल्या आहेत.

पुरेसा औषध साठा- साथरोग प्रतिबंधासाठी आणि संभाव्य पूर परिस्थितीमध्ये निवारा छावण्यांसाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास होणारी हानी टाळता येईल..

वृषाली पाटील,
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर.

- Advertisement -