Home शहरे अकोला आम्ही आपल्या सोबत आहोत; खूप अभ्यास करा.. रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा.. – पालकमंत्री कु.आदिती तटकरे – महासंवाद

आम्ही आपल्या सोबत आहोत; खूप अभ्यास करा.. रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा.. – पालकमंत्री कु.आदिती तटकरे – महासंवाद

0
आम्ही आपल्या सोबत आहोत; खूप अभ्यास करा.. रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा.. – पालकमंत्री कु.आदिती तटकरे – महासंवाद

अलिबाग,दि.21 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील पहिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पहिली तुकडी पाहताना होत असलेला आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. तब्बल एका दशकानंतर रायगडकरांची स्वप्नपूर्ती होताना खूप समाधान मिळत आहे. मुलांनो आम्ही आपल्या सोबत आहोत.. खूप अभ्यास करा.. रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

येथील अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आरसीएफ कॉलनी, कुरुळ येथे अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधताना त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने, सह अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, कार्यकारी अभियंता श्री.जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी श्री.प्रशांत ढगे, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री.सुनील चव्हाण, आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी श्री.संतोष वझे, जनसंपर्क वरिष्ठ व्यवस्थापक श्री.प्रमोद देशमुख तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, हे महाविद्यालय याच वर्षी सुरू होण्यासाठी विविध स्तरांवर अथक प्रयत्न करावे लागले. अनेक अडचणी आल्या परंतू सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून अखेर हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आम्ही सर्वजण यशस्वी झालो. मात्र हे यश केवळ आमचे नसून तुम्हा विद्यार्थ्यांचे आणि तुमच्या पालकांचे आहे. कारण आपण आपल्या भविष्यासाठी महाविद्यालयाची निवड करताना या अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निवड केलीत. कोणतेही काम प्रयत्नांना प्रतिसाद मिळाल्यानंतरच यशस्वी होते. आमच्या प्रयत्नांना आपण दिलेल्या प्रतिसादामुळेच हे यश मिळाले आहे. त्यामुळे मी आपले व आपल्या पालकांचे मनस्वी आभार मानते.

या महाविद्यालयाची ही नवीन सुरूवात असल्याने निश्चितच सोयी-सुविधांच्या दृष्टीने काही अंशी कमतरता आहे मात्र पुढील काही दिवसांमध्ये या कमतरता दूर केल्या जातील, अशी ग्वाही देवून विद्यार्थ्यांना तुम्ही निश्चिंत राहा, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा, आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत. येथील सोयी-सुविधा, आपली सुरक्षा ही आमची सर्वांची जबाबदारी आहे, आम्ही सर्व ही जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडू, असेही त्या म्हणाल्या.

शेवटी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यासाठी आरसीएफ प्रशासनाने केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल पालकमंत्र्यांनी आरसीएफ प्रशासनाचे आणि उपस्थित आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी श्री.संतोष वझे, जनसंपर्क वरिष्ठ व्यवस्थापक श्री.प्रमोद देशमुख यांचे पुष्पगुच्छ देवून विशेष अभिनंदन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी श्री.संतोष वझे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विशेष पाठपुरावा करून, अथक परिश्रम घेवून हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्याबद्दल पालकमंत्री कु.तटकरे यांचे अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देवून विशेष आभार मानले. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्र्यांनी येथील सोयी-सुविधांबाबत, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींबाबत उपस्थित विद्यार्थ्यांशी व प्राध्यापकांशी अनौपचारिक चर्चाही केली व त्यांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती वंदना व दीपप्रज्वलनाने झाली. तसेच पालकमंत्री कु.आदिती तटकरे व उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एम.सोनुने यांनी केले, सूत्रसंचालन डॉ.रुबिया शेख यांनी केले तर आभार डॉ.प्रणाली शिंपी यांनी मानले.

00000