आयपीएल 2020च्या आधीच Hardik Pandya पुनरागमन करणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार

- Advertisement -

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी कसून मेहनत घेत आहे आणि त्यामुळेच त्यानं न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली. जवळपास सहा महिने हार्दिक क्रिकेटपासून दूर आहे आणि त्याची फटकेबाजी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चाहत्यांसाठी आता Good News आहे. हार्दिक लवकरच मैदानावर दिसणार आहे. पण, तो टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार नाही. हार्दिक डी वाय पाटील ट्वेंटी-20 स्पर्धेत खेळणार आहे.

26 वर्षीय हार्दिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. हार्दिकची दुखापत ही टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मोहीमेला मोठा धक्का समजला जात आहे. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्याला लंडनमध्ये शस्त्रक्रीयेसाठी जाण्यास सांगितले. शस्त्रक्रीयेनंतर हार्दिक न्यूझीलंड दौऱ्यातून कमबॅक करेल अशी आशा होती. पण, तसे झाले नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघात त्याची निवडही झाली होती, परंतु पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यानं त्यानं माघार घेतली. 

मागील महिन्यात तो पुन्हा लंडनमध्ये उपचारासाठी गेला होता. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत आहे. मिड डे नं दिलेल्या वृत्तानुसार हारिद्क डीवाय पाटील ट्वेंटी-20 स्पर्धेत खेळणार आहे.  त्यानंतर तो इंडियन प्रीमिअर लीगमध्येही खेळताना दिसणार आहे. 

हार्दिकची दुखापत…
हार्दिकची दुखापत ही गंभीर स्वरुपाची होती. त्याच्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरु होते. त्याच्या पाठिच्या मणक्याला मोठा मार लागलेला होता. त्यामुळे त्याच्या मणक्यावर शस्त्रक्रीया करावी लागली आणि त्यासाठी तो लंडनला गेला होता. हार्दिकनं न्यूझीलंड दौऱ्याच्या मध्यंतरापर्यंत कमबॅक करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. पण, त्यानं माघार घेतली. यापूर्वी हार्दिक म्हणाला होता की,”न्यूझीलंड मालिकेच्या मध्यंतरापर्यंत मी कमबॅक करेन. काही आंतरराष्ट्रीय सामने, आयपीएल आणि त्यानंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, हा माझा प्लान आहे. माझ्यासाठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप हा महत्त्वाचा आहे.”

- Advertisement -