
धन्वंतरी पुरस्कारांचे वितरण
मुंबई, दि. २० : आयुर्वेद व योगाभ्यास यांच्या प्रचार व प्रसारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाची निर्मिती केली. या आयुष मंत्रालयाच्या कार्याचा प्रचार व प्रसार सर्वत्र होण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
एनसीपीए येथील जमशेद भाभा थिएटर येथे आयोजित धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘देश का प्रकृती परीक्षण’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप कार्यक्रमात श्री. जाधव बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य. राजेश कोटेचा, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे सभापती वैद्य. जयंत देवपुजारी, पद्मश्री देवेंद्र त्रिगुणा, वैद्य. राकेश शर्मा, देश का प्रकृति परीक्षण अभियानाचे सचिव डॉ. आशुतोष गुप्ता, सच्चिदानंद प्रसाद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून २६ नोव्हेंबर २०२४ रोजी देश का प्रकृति परीक्षण हे अभियान जाहीर करण्यात आले. या अभियानाचा पहिला टप्पा २५ डिसेंबर २०२४ रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला. या अभियान कालावधीत आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकृती परिक्षण केले. या एक महिन्याच्या कालावधीत या अभियानाच्या अनुषंगाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून एका महिन्यात सर्वाधिक प्रतिज्ञा व डिजिटल प्रमाणपत्र दाखविणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाईन फोटो अल्बम व समान वाक्य बोलणाऱ्या लोकांचा व्हिडीओ अल्बम तयार करण्यात आला. आयुष मंत्रालयाची व्याप्ती वाढवून आयुर्वेदाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी धन्वंतरी दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचप्रमाणे जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करण्याची कार्यवाहीही करण्यात येत आहे. तसेच भविष्यात आयुष मंत्रालयाच्या कामकाजात ‘एआय’ चा वापर करण्यात येईल, असेही केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी यावेळी सांगितले.
धन्वंतरी पुरस्कारार्थी तसेच आयुष मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या विविध पुरस्कारार्थींचे अभिनंदन करताना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आयुर्वेद, योगाचा जागतिक पातळीवर प्रचार प्रसार करण्यासोबतच देशात ‘देश का प्रकृती परिक्षण’ अभियान राबविण्यात आले. त्याचपद्धतीने राज्याच्या अर्थसंकल्पातदेखील आयुष किंवा आयुर्वेदासाठी तरतूद करण्यावर भर देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.
धन्वंतरी पुरस्कारार्थी :
- वैद्य माया राम उनियाल 2. वैद्य ताराचंद शर्मा,3. वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना रुपये 5 लाखाचा धनादेश व स्मृती चिन्ह, कलश व सन्मानपत्र देऊन धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याचप्रमाणे देश का प्रकृती परिक्षण अभियानाच्या कालावधीत :
- एका महिन्यात आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 2. एका आठवड्यात आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 3. 24 तासांत आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 4. डिजिटल प्रमाणपत्र दाखवणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन फोटो अल्बम / पिन बॅज घातलेल्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन फोटो अल्बम. 5. समान वाक्य बोलणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन व्हिडिओ अल्बम.
या पाच बाबींसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे जाहीर करून त्याबाबतचे प्रमाणपत्र या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आले.
यासोबतच देश का प्रकृति परीक्षण अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यांचा व देशातील आयुर्वेदिक महाविद्यालयांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आशुतोष गुप्ता यांनी केले तर आभार सच्चिदानंद प्रसाद यांनी मानले.
0000