.मुंबई: दहिहंडी उत्सव अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला अाहे. त्यामुळं मुंबईसह उपनगरातील सर्व गोविंदा पथक थरांचा जोरदार सराव करत आहेत. मात्र दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना आणि आयोजकांना परवानगी घेणं गरजेचं असतं. त्यामुळं यंदाचा दहिहंडी उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी उत्सवाच्या परवानग्या मंडळांना व आयोजकांना सुलभतेने द्या, असे निर्देश क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. दहीहंडी उत्सवाबाबत मंत्रालयात क्रीडा मंत्र्यांच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीत क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं
आढावा बैठक
या आढावा बैठकीत पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांचा १० लाखांपर्यंत विमा उतरवण्यात यावा, ध्वनी प्रदूषण होऊ नये, तसेच गोविंदाच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, मँट याचा वापर करण्यात यावा उत्सव स्थळी ॲम्बुलन्स उपलब्ध असणं बंधनकारक आहे, अशा अटी न्यायालयानं घातल्या आहेत. या अटींचं पालन करून आयोजक आणि गोविंदा पथक यांना परवानग्या सुलभतेने देण्यात याव्यात, अशी भूमिका दहीहंडी समन्वय समितीनं मांडली.
साहसी क्रीडा प्रकार
समन्वय समितीनं मांडलेल्या भूमिकेचं स्वागत करुन परवानगी देताना शासकीय यंत्रणेनं त्यामध्ये सुलभता आणावी, असे निर्देश आशिष शेलार यांनी दिले. तसेच, गोविंदा पथकांचा विमा, तसेच वाहतूक नियंत्रणाचा प्लॅन याबाबतही पोलिसांनी दक्षता घ्यावी. दहिहंडी हा साहसी क्रीडा प्रकार म्हणून खेळला जावा तसेच त्याचा प्रसार व्हावा यासाठी ही समन्वय समातीने प्रयत्न करावेत, असं आवाहन देखील यावेळी आशिष शेलार यांनी केलं.