हायलाइट्स:
- आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक
- सोलापुरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर
- पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू
सुप्रीम कोर्टाने मराठा समाजविरोधी दिलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून एकत्र आलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकानां सुरुवातीला पांगवण्यात आलं. मात्र, यावेळी समन्वयक माऊली पवार यांना पोलिसांनी माध्यमांशी बोलण्यास मज्जाव करत धरपकड केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते भाऊसाहेब रोडगे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी चौकात हे दोन्ही मराठा समाजाचे नेते आले असता फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत आंदोलन चिरडून टाकले. मुख्य नेत्यांनीच धरपकड झाल्याने कार्यकर्त्यांनीही मग आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला.
खरंतर, न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाज दुखावला गेला आहे. यामुळे अनेकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यात सध्या कोरोनामुळे कडक लॉकडाऊन आहे. अशात कोर्टाचा हा निर्णयामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. पंढरपूरमध्येही मराठा समाज आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मुंडन करत अर्ध नग्न आंदोलन केले.
कोरोनाच्या संकटात मराठा समाज रस्त्यावर
राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यात आंदोलनाला सुरुवात झाली असून मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकार आणि केंद्राविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यामुळे याचे पुढे काय परिणाम होतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.