आरेमध्ये सातत्याने आग कशी लागते? ही आग स्थानिकांकडून लावली जात असल्याचीही चर्चा सुरू आहे. भूमाफियांचा यात समावेश असावा, असाही मुद्दा यासंदर्भात उपस्थित केला जात आहे. सन २०१८ पासून दिंडोशीमध्ये सुरू झालेले आगीचे सत्र आता आरेतील आगींबाबतही सुरू आहे. यासाठी दिंडोशी प्रकरणी न झालेली कारवाईही कारणीभूत असल्याचे ‘आरे वाचवा‘ चळवळीतील संजीव वासलन यांनी व्यक्त केला. आरे आग प्रकरणीही आत्तापर्यंत एकाही व्यक्तीवर कारवाई का झालेली नाही? असेही त्यांनी विचारले.
आरेमध्ये तीन ठिकाणी प्रामुख्याने आग लागलेली सातत्याने दिसून येत आहे. यामध्ये युनिट नंबर १३च्या जवळ गणेशनगर झोपडपट्टीजवळ, आरे गेस्ट हाऊस आणि युनिट नंबर १६ च्या शाळेदरम्यानच्या जागेला आणि मेट्रोच्या प्रकल्पामध्ये झाडांचे पुनर्रोपण करायच्या साइटवर तपेश्वर मंदिराजवळ आग लागत आहे. यामुळे ही जमीन हडपण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची शंका व्यक्त होते. एकाच ठिकाणी आग लागूनही त्यानंतर तिथे काळजी का घेतली जात नाही? हाही प्रश्न वासलन यांनी उपस्थित केला. वनखात्याकडे आरेची जमीन जाण्यापूर्वी शक्य तेवढी जमीन गिळंकृत करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसते, असेही पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
आदिवासी हक्क संवर्धन समितीच्या उपसचिव मनीषा धिंडे यांनी आदिवासींकडून आग लावली जाते या म्हणण्याचा निषेध करत, आम्ही आमचीच झाडे का जाळू? असा प्रश्न विचारला. धिंडे यांच्या वडिलोपार्जित सुमारे १०० झाडे एप्रिल महिन्यामध्ये आगीमध्ये जळाली. आदिवासी शेतीसाठी जमीन भाजतात. मात्र हे भाजण्याचे काम काळजीपूर्वक केले जाते. त्यामुळे या माध्यमातून आग लावली जाते हा दावा चुकीचा असल्याचे त्या म्हणाल्या. आदिवासींना काहीही करून या जमिनीवरून हुसकावून लावायचे आहे, असे यामुळे वाटत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.